BMC पाठोपाठ आता परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी Pune Municipal Corporation चं विशेष व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह; पहा कुठे, कधी, कशी मिळणार लस?
Covid-19 Vaccination |(Photo Credits: PTI)

Vaccine For Students Going Abroad:  मुंबई पाठोपाठ आता पुण्यामध्येही यंदा परदेशी शिक्षणासाठी बाहेर जाणार्‍या विद्यार्थ्यांना वेळेत लस मिळावी मिळावी आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान टळावं या उद्देशाने आता पुणे महानगर पालिकेकडूनही (PMC) विशेष सोय करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणार्‍यांना आता पुण्यात मंगळवार आणि बुधवार कमला नेहरू हॉस्पिटल (Kamala Nehru Hospital) पुणे इथे वॉक ईन पद्धतीने लस (COVID-19 Vaccine)  मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र घेऊन लसीकरण केंद्रावर पोहचायचे आहे तेथे कागदपत्र पाहून विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे.

महाराष्ट्रात सध्या सरकारी लसीकरण केंद्रांवर लसींच्या तुटवड्यामुळे 18-45 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. पण या शासन निर्णयामुळे परदेशात शिकायला जाणार्‍या काही विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी बीएमसीच्या केंद्रावर विद्यार्थ्यांना लसीकरणाची सोय खुली करून देतानाच राज्यात इतर महापालिकांसोबतही बोलणं सुरू असल्याची माहिती दिली होती त्यानुसार आता पुण्यात ही सोय सुरू झाली आहे.

पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक माहिती

पुणे महानगरपालिका आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी लस घेण्यासाठी जायचं आहे त्यांना अ‍ॅडमिशन कन्फर्मेशन लेटर, पासपोर्ट कॉपी, सोबत व्हॅलिड व्हिसा आणि अन्य कागदपत्र studentvaccination.pune@gmail.com वर मेल करायची आहेत. यानंतर मंगळवार, बुधवारच्या सेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी तशी लसींची सोय केली जाणार आहे. त्यांना अपॉईंटमेंट दिली जाणार आहे.

दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्वीट करत विद्यार्थ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्याचं आवाहन केले आहे. जर विद्यार्थी संख्या अधिक असेल तर ही सोय आठवडाभर सुरू केली जाईल असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

सध्या अनेक देशांनी प्रवासासाठी कोविड व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट्स बंधनकारक केली आहेत. त्यामुळे परदेशी विद्यापीठांमध्ये अ‍ॅडमिशन झालेल्यांना या लसीकरणाचा अडथळा असू नये म्हणून सध्या विशेष सोय खुली करण्यात आली आहे.