Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी ‘टेलिआयसीयू’ सुविधेचा (Tele ICU Technology) वापर केला आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या 7 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज सांगितलं आहे.

राज्यात उपचार सुरू असलेल्या 75 टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 75 टक्के कोरोनाची लक्षणे नाहीत. यातील 10 ते 15 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. मात्र, 3 टक्के रुग्ण जे गंभीर आहेत, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार आवश्यक आहेत. अशा रुग्णांवर उपचार करताना आयसीयूमधील जे विशेषज्ञ आहेत त्यांची संख्या वाढविली जात आहे. परंतु, ‘मेडिस्केप’ या डॉक्टरांच्या फौडेशनमार्फत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘टेलिआयसीयू’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनने दिला असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 3827 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर 142 जणांचा मृत्यू)

राज्यातील सात जिल्ह्यातील आयसीयूचे या फाऊंडेशनच्या माध्यमातून व्यवस्थापन केलं जाणार आहे. यासाठी आयसीयूमधील प्रत्येक बेडला लावलेल्या मॉनिटरवरील रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीचे नियंत्रण ‘टेलिआयसीयू’ मार्फत केले जाईल. या सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून उपचाराचा सल्ला देणार आहेत. सध्या 7 जिल्ह्यांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यातही ही सुविधा सुरू केली जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.