राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी रविवारी यूपीए अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करणारा पक्षाच्या युवक शाखेचा ठराव धुडकावून लावला. समविचारी पक्षांच्या सतत संपर्कात असलेल्या पवारांनी स्पष्ट केले की, मी यूपीएचे नेतृत्व करण्यास इच्छुक नाही, परंतु पक्षांना एकत्र आणण्यासाठी कोणी पुढाकार घेत असेल तर आपण त्याला पाठिंबा देऊ तसेच सहकार्य करू. या विषयावरील चर्चेला पूर्णविराम देताना ते म्हणाले, ‘मला यूपीए प्रमुख होण्यात शून्य स्वारस्य आहे.’
ते म्हणाले, ‘आमच्या तरुण सहकाऱ्यांनी यूपीए अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची शिफारस करणारा ठराव मांडला. पण मला त्यात अजिबात रस नाही. मी कोणतीही जबाबदारी घेणार नाही. मी पाठिंबा आणि मदतीसाठी तयार आहे.’ परंतु याबाबत एका माजी केंद्रीय मंत्र्याने स्पष्ट केले की, विरोधी पक्ष एकत्र येण्याचा (भाजपला पर्याय देण्यासाठी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत) असा युक्तिवाद होत असताना, काही वास्तवांकडे दुर्लक्ष करू नये.
शरद पवार यांना महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार म्हणून पाहिले जाते. ‘इतर पक्षांची विविध राज्यांत सत्ताकेंद्रे आहेत. पण काँग्रेस हा एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी-अधिक प्रमाणात आहे. हा पक्ष सत्तेत नसला तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात काँग्रेसचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. तुम्हाला काही करायचे असेल, तर काँग्रेस पक्षाच्या देशव्यापी पोहोचाचा विचार करणे आवश्यक आहे,’ असे निरीक्षण पवार यांनी नोंदवले.
विविध पक्षांद्वारे विचारात घेतलेल्या कोणत्याही भाजप पर्यायाचा काँग्रेस हा अविभाज्य भाग असला पाहिजे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. एकापाठोपाठ एक पराभवानंतर मोठ्या संघटनात्मक संकटातून मार्ग काढत असलेल्या काँग्रेस पक्षालाही त्यांनी संकेत दिला आहे की, बिगरभाजप युती करताना प्रादेशिक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची ताकद आणि क्षमता कॉंग्रेसला दुर्लक्षित करता येणार नाही. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व बिगर-भाजप पक्षांना आणि इतर विरोधी नेत्यांना भाजपचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर पवारांचे हे विधान समोर आले आहे. (हेही वाचा: शरद पवार यांचे राज ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर; 'चार-पाच महिने गायब असतात मग अचानक व्याख्यान देतात')
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यूपीए प्रमुख ही काँग्रेस पक्षाची मालमत्ता नसल्याचे सांगून, यूपीएमध्ये फेरबदल करण्याची मागणी केली होती. त्याला काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत म्हटले होते की, यूपीएचा सदस्य नसलेल्या पक्षाला (शिवसेना) त्यांच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.