गुढीपाडव्यानिमित्त मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकासआघाडी आणि शिवसेना यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar on Raj Thackeray) यांनी आज (3 एप्रिल) तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. शरद पवार हे कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी बोलताना शरद पवार म्हमाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमीच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. त्या उलट राज ठाकरे मात्र सलग दोन-दोन.. चार-चार महिने गायब असतात. त्यानंतर अचानक एऊन एखादं लेक्चर देतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
शिवाजी पार्क येथील मैदानावर केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील जातीपातीच्या राजकारणास शरद पवार हेच जबाबदार असल्याची टीका राज यांनी केली होती. या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आजही आहे आणि उद्याही राहील. राज ठाकरे यांच्या भूमीकेत सातत्य आढळत नाही. या आदी ते अनेकदा स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, Yavatmal: राज ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले - राज ठाकरे बोलतायत ते सत्यच)
दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यावर बोललल्या शिवाय हेडलाईन होत नाही. त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर बोलत असतात. त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी मुद्देच राहिले नाहीत. पाठीमागच्या दोन-अडीच वर्षांमध्ये महाविकासआघाडीने विकासाचे अनेक मुद्दे पूर्ण केलेत. त्यामुळे विकासावर बोलण्यासाठी त्यांच्यावर काहीच नाही. त्यामुळे आता ते अशा प्रकारची टीका करताना दिसत असल्याचे सुप्रिया यांनी म्हटले आहे.