Union Home Minister Amit Shah | ( Photo Credits: Twitter/ ANI )

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. भाजप उमेदवार प्रचारार्थ अमित शाह यांची सांगली जिल्ह्यातील जत येथे आज (10 ऑक्टोबर 2019) जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. अमित शाह यांच्या भाषणात कलम 370 चा सातत्याने उल्लेख होता. कलम 370 वरुन अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. सांगली येथील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्यामुळे अवघा भारत एक झाला.

राहुल गांधी आणि शरद पवार हे कलम 370 चे समर्थन करतात काय? असा सवाल उपस्थित करत अमित शाह म्हणाले, राहुल गांधी म्हणत होते की, कलम 370 हटवले तर जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील. परंतू, 5 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबर या कालावधीत रक्ताचे पाट तर सोडाच. एक गोळीही झाडावी लागली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा अधिक भक्कम केल्याचा दावाही अमित शाह यांनी या वेळी केला. या वेळी अमित शाह यांनी जोर देत सांगितले की, जर भारताचा एक जवान शहीद झाला तर 10 शत्रू मारले जातील. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ BJP च्या प्रचारासाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौर्‍यावर)

एएनआय ट्विट

अमित शाह यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सवाल केला की, सलग 15 वर्षे सत्तेत राहून या दोन्ही पक्षांच्या सरकारनी जनतेसाठी काय केले? गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने जनतेसाठी अनेक विकासकामे केली असेही शाह यांनी सांगितले. एका बाजूला सत्तेत असलेले भाजप-शिवसेना पक्ष विकासासाठी निवडणूक लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला घराणेशाही जपणारे विरोधी पक्ष स्वार्थासाठी निवडणूक लढत आहेत, असेही शाह यांनी म्हटले.