Tulsi Lake Overflow: मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले
Tulsi Lake | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात मान्सून 2021 चे आगमन मोठ्या दणक्यात झाले. त्यानंतर पावसाने अल्पावधीतच दडी मारली. ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं यंदा भरणार की नाही? याबाबत मोठी चिंता व्यक्त होऊ लागली. दरम्यान, पावसाने आता पुन्हा नव्याने पुनरागमन केले आहे. धरण परिसरातही पाऊस बऱ्यापैकी कोसळू पाहात आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा दिलासा आहे. मुंबईकरांसाठी पहिली खुशखबर तुळशी तलाव (Tulsi Lake) परिसरातून आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेले छोटे धरण म्हणजे तुळशी धरण. हे धरण शुक्रवारी (16 जुलै) पूर्ण क्षमतेने (Tulsi Lake Overflow) भरले. सकाळी 11 वाजता हे धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले. येत्या काही दिवसात इतर तलावही पूर्ण क्षमतेने भरतील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. हा तलाव मुंबईला प्रतिदिन सरासरी 18 दशलक्ष लिटर म्हणजे 1.8 कोटी लीटर इतका पाणीपुरवठा करते. धरण क्षेत्रात पाऊस म्हणावा तितका पडत नसल्यामुळे हा पूर्ण क्षमतेने भरण्यास मर्यादा येत होत्या. मात्र काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस पडू लागल्याने हे धरण भरल्याची माहिती महापालिका जल अभियंता विभागाकडून देण्यात आली. (हेही वाचा, Mumbai Water Supply Update: मुसळधार पाऊस; जलमय मुंबईत पाणी पुरवठा खंडीत; भांडुप पंपिंग स्टेशन तुंबल्याने फटका)

एएनआय ट्विट

मुंबई शहरात रविवारी रात्री 12 वाजलेपासून संततधार पाऊस बरसला. मुंबई शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. विभागवार पावसाची नोंद पाहता सांताक्रूज - 217.5 मिमीस, कुलाबा - 178 मिमी,महालक्ष्मी - 154.5 मिमी, वांद्रे - 202 मिमी, जुहू विमानतळ - 197.5 मिमी, राम मंदिर - 171.5 मिमी, मीरा रोड - 204 मिमी, दहिसर - 149.5 मिमी, भायंदर - 174.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. मध्यरात्री 12 ते साधारण 3 वाजेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावासाने सखल भागात मुंबईत पाणी साचले. त्यातच भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये (Bhandup Pumping Station) मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्याचा फटका मुंबईच्या पाणी पुरवठ्यास बसला. त्यामुळे पाणी साचलेल्या मुंबईत मुंबईकरांना पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाले.