औरंगाबाद येथे 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, तिघांना अटक
Demonetized Currency (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रातील (Maharashtra) औरंगाबाद (Aurangabad) येथे पोलिसांनी 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा (Demonetized Currency) जप्त केल्या आहेत. या प्रकरणात 3 तरुणांना अटकही करण्यात आली आहे. पोलिसांकडे नोंदवलेल्या एफआयआरनुसार या जुन्या आणि बंद नोटा पुण्याहून औरंगाबादला आणल्या जात होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवैध कामासाठी आरोपींना 20 लाख रुपये मिळणार होते. भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. नोटाबंदी करुन 3 वर्ष होत आले तरीदेखील जुन्या नोटा सापडत असल्याची बातमी आपल्या कानावर पडत आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अनपेक्षित निर्णय घेतला आणि नोटाबंदीची घोषणा केली, ज्यामुळे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडल्या आहेत. देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, "भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी आम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री (8 नोव्हेंबर, 2016) पासून या नोट्स कायदेशीर खर्च करता येणार नाही", असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. या निर्णयानंतर लोकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागला होता. हे देखील वाचा- विरार: घरच्याच सुनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या 50 वर्षीय सासऱ्याला पोलिसांकडून अटक

नोटाबंदीच्या जवळपास 3 वर्ष होऊनही जुन्या नोटा सापडने धक्कादायक आहे. याआधी, इंदूर येथील पोलिसांनी मे महिन्यात 73.15 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली होती. लोकांकडे अजूनही या नोटा मोठ्या संख्येने कसे अस्तित्वात आहेत हे समजण्यापलीकडे आहे. महत्वाचे म्हणजे या जुन्या नोटांचा काय करणार होते, याची अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.