Mumbai: कॉटन ग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान एका महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल
Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, पाकिट, मोबाईल चोरी अशा प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, कॉटन ग्रीन (Cotton Green) आणि शिवडी (Sewri) स्थानकादरम्यान एका महिलेसोबत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे या महिलेला आपला जीव गमवाव लागला असता. सुदैवाने, या महिलेला गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रगती सरफरे असे त्या महिलेचे नाव आहे. प्रगती या परळ येथील रहिवाशी असून त्या नोकरी करतात. यासाठी त्या नेहमी लोकलमधून ये-जा करतात. प्रगती यांनी काही दिवसांपूर्वी कामावरून घरी येत असताना पनवेल ट्रेन पकडली होती. त्या शिवडी स्थानकावर उतरणार असल्याने त्या कॉटन ग्रीन स्थानकानंतर दरवाजात येऊन उभ्या राहिल्या. परंतु, कॉटन ग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान मोबाईला चोरट्यांनी त्यांच्या हातावर जोरदार फटका मारला. ज्यामुळे त्यांचा मोबाईल खाली पडला. सुदैवाने, या घटनेत प्रगती यांना जास्त दुखापत झाली नाही. परंतु, या घटनेमुळे महिला वर्गामध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai Power Outage: मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर; वर्तवली Cyber Attack ची शक्यता

यासंदर्भात प्रगती यांनी पती सुशांत यांच्यासोबत जाऊन वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन तासानंतर त्यांची तक्रार दाखल करण्यात आली. तसेच त्यांचा मोबाईल मिळेल, असेही पोलिसांनी सांगितले. परंतु, पण या घटनेत माझ्या पत्नीचे काही बरे-वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सुशांतने त्या ठिकाणी उपस्थित केला. तसेच मोबाइलसाठी आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या नराधमांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

अनेकदा गर्दीत चोरी होऊ नये, यासाठी मोबाईल, पैशांचे पाकिट बॅगेत ठेवतात. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरांची टोळी हात चलाखीने अत्यंत सफाईदारपणे पाठीवरील सॅकबॅगेची चेन उघडतात. बॅगेतील मौल्यवान वस्तूंसह पसार होतात, असे पोलिसांनी सांगितले आहे.