Mumbai Power Outage: मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर; वर्तवली Cyber Attack ची शक्यता
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये (Mumbai) जे वीज संकट (Power Outage) उद्भवले होते त्यामागचे कारण हे ‘सायबर हल्ला’ (Cyber Attack) असावे, असे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या सायबर सेलच्या चौकशी अहवालाचा हवाला देऊन सांगितले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमवेत संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित करताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र सायबर सेलने आपल्या प्राथमिक अहवालात असे नमूद केले आहे की, परकीय सर्व्हरकडून एमएसईबी (राज्य विद्युत मंडळा) सर्व्हरकडे बेहिशेबी डेटा हस्तांतरित केला जाऊ शकतो. मात्र नक्की कोणत्या देशाकडून हा डेटा हस्तांतरित केला गेला आहे याबाबत त्यांनी माहिती दिली नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीने 28 फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबईच्या ईलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन देशाने मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी दि. 1 मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसेच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे.

मुंबईत वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, ऊर्जा विभागाने याप्रकरणी गठित केलेल्या तांत्रिक तपास समिती आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सायबरचा अहवालही प्राप्त झाला आहे. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या अहवालांच्या अनुषंगाने अधिक माहिती विधानमंडळात सादर केली जाईल. (हेही वाचा: Mumbai Power Outage: मुंबईमधील मागच्यावर्षीच्या वीज संकटांमागे चीनचा हात, केला होता सायबर हल्ला; अमेरिकन रिसर्च ऑर्गनायझेशनचा दावा)

दरम्यान, गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बत्ती गुल करण्यामागे चीनचा हात होता, असा दावा अमेरिकेच्या एका अहवालात करण्यात आला आहे. मुंबई ब्लॅकआउट हा गलवान संघर्षाशी संबंधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, गलवान हिंसाचारानंतर लडाखमधील एलएसीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला भारताला दाखवायचे होते की, जर भारताने अधिक सख्ती दर्शविली तर संपूर्ण देशाला ब्लॅकआउटचा सामना करावा लागेल.