Dr. Ramrao Maharajs (PC - Facebook)

Dr. Ramrao Maharajs Funeral: बंजारा समाजाचे धर्मगुरु आणि संत सेवालाल महाराजांचे वंशज डॉ. रामराव महाराज (Dr. Ramrao Maharajs) यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री रामराव महाराजांचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पोहरादेवी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या भाविकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलीत करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जिल्हा पोलिस अधीक्षक, विश्वस्त मंडळ आणि राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्यात चर्चा झाल्यानंतर रामराव महाराज यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रामराव महाराजांच्या अंत्यविधीला देशभरातून हजारो अनुयायी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोहरादेवी आणि इतर जिल्ह्यातून येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. तसेच पोहरादेवी येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

दरम्यान, रामराव महाराजांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. 'रामराव बापू महाराज यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं. गरीब आणि वंचित समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. काही महिन्या आधी मला त्यांना भेटण्याचं भाग्य लाभलं. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,' असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराजांप्रती सदिच्छा व्यक्त करताना म्हटलं आहे. (हेही वाचा - Mumbai Local Updated: मुंबईत 1 नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 610 फेऱ्या वाढवल्या जाणार; केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची माहिती)

डॉ. रामराव बापू महाराजांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी- परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली होती. त्यांचा जन्म पोहरादेवी येथील रामावत परिवारात झाला. रामरावांच्या बालपणीचं त्यांच्या वडिलाचे निधन झाले. त्यांनी बंजारा तांड्यातील लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेत व्यतीत केलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.