मुंबईमध्ये (Mumbai) दोन दिवसांपूर्वी एमसीजीएमने (MCGM) 40,400 कोरोना विषाणू (Coronavirus) चाचण्या केल्या, ज्यातील 5,458 चाचण्या कोरोना सकारात्मक आल्या आहेत. यातील 83 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नव्हती. यावेळी एकूण मृत्यूची संख्या 10 होती. काल एमसीजीएमने 47,000 कोविड चाचण्या केल्या, यातील 5,365 चाचण्या सकारात्मक आल्या होत्या. यातील 84 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नव्हती. या पार्श्वभूमीवर एमसीजीएमने शहरातील डीसीएचसी/डीसीएचची कोरोना बेड्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईमधील कोविड बेड्सची संख्या 13,773 (त्यापैकी 5,140 रिकामे आहेत) वरून पुढील 15 दिवसांच्या कालावधीत 21,000 डीसीएचसी/डीसीएच कोविड बेडपर्यंत जाणार आहे.
मुंबईमधील कोरोनाची संख्या वाढून दिवसाला 10 हजार रुग्ण आढळतील असे गृहीत धरून, ही बेड्सची संख्या वाढवली जात आहे. यामध्ये लक्षणे असणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बेडची गरज भासणार आहे व त्याला 14 दिवसांची सायकल पूर्ण करावी लागेल. अशावेळी दहा हजार रुग्णांच्या 6-8 आठवडे कालावधीसाठी 21 हजार अतिरिक्त बेड्सची आवश्यकता भासणार आहे. वरील आकडेवारीनुसार, मुंबईमधील विविध रुग्णालयांमध्ये आवश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी एमसीजीएम सक्षम असणार आहे.
यासह, एमसीजीएमने सध्यापेक्षा जास्त चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात दररोज 60,000 चाचण्या घेतल्या जातील. सध्या मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे, मृत्यूंची संख्या बरीच घटली आहे. अशा स्थितीत परिस्थिती एमसीजीएमच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न झाल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत शहरात 10 लाख लसीकरण पूर्ण करण्यात आले असून, येत्या काही दिवसांत ही संख्या वाढवून 1 लाख प्रती दिवस करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. (हेही वाचा: मुंबईमधील वाढत्या Coronavirus च्या पार्श्वभूमीवर कोविड बेड्सची संख्या 13,773 वरून 21,000 होणार; दिवसाला 1 लाख लसीकरणाचे लक्ष्य)
दरम्यान, कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी होलिकोत्सव व धुलिवंदन/रंगपंचमी खाजगी तसेच सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बीएमसीने सांगितले आहे.