Air Pollution | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ठाण्यात (Thane) वाढती बांधकामे आणि वाहनांची संख्या यामुळे धुळीचे प्रदूषण (Dust Pollution) वाढत आहे. आता यावर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे महानगरपालिका (TMC) येत्या काही दिवसांत शहरात धुळीचे प्रदूषण पसरवणाऱ्यांना 5000 रुपये ते 25,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावणार आहे. नुकतेच टीएमसी येथे स्वच्छ हवा कृती योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत टीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

पायाभूत सुविधांची विविध कामे करताना धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना न केल्यास 5000 ते 25000 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे हेरवडे यांनी बैठकीत स्पष्ट केले. बैठकीला विविध विभागातील तज्ज्ञ उपस्थित होते. या बैठकीला ठाणे शहरातील विकासक, आरएमसी प्लांटचे चालक, रस्त्यांच्या कामाचे कंत्राटदार, मेट्रो रेल्वेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. टीएमसीच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी उपस्थितांना ठाणे शहरातील वायू प्रदूषणाची माहिती दिली.

धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. टीएमसीच्या उपायुक्त अनघा कदम म्हणाल्या, ‘प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाचे एक दक्षता पथक तयार केले जाईल.’ (हेही वाचा: Mumbai Heatwave: मुंबईत उकाडा वाढल्याने वीजेच्या मागणीत मोठी वाढ)

इमारत बांधकाम, आरएमसी प्लांट, रस्ते कंत्राटदार आणि मेट्रो कामासाठी टीएमसीने जारी केले नियम-

नियमानुसार इमारतीच्या सभोवताली बांधकाम बॅरिकेडिंग करणे आवश्यक आहे.

इमारतीचे प्लास्टर करताना संरक्षक जाळी लावणे आवश्यक आहे.

बांधकामादरम्यान कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकच्या कचऱ्याचे ड्रम वापरणे आवश्यक आहे.

वाळू, माती आणि सिमेंटमुळे होणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर वापरावे.

इमारतीच्या बांधकामासमोरील रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी रेन गनचा वापर करावा.

बांधकाम आणि पाडण्याच्या साहित्याची वाहतूक करताना ट्रक ताडपत्रीने झाकलेले असावेत.

इमारत बांधताना कचरा टाकण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, 2022-23 चा हिवाळा महाराष्ट्र आणि गुजरातसाठी चार वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित होता. ग्लोबल थिंक टँक सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) ने जारी केलेल्या नवीन विश्लेषणात ही माहिती समोर आली आहे. नुकतेच सात सदस्यीय समितीने वायू प्रदूषण कमी करण्याच्या एक आराखडा सादर केला होता. त्यानंतर आता बीएमसीने त्यांच्या सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला अतिरिक्त महापालिका आयुक्तांना या योजनेवरील कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.