Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबईसह (Mumbai)  राज्यात उकाडा (Heatwave) वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. उकाडा वाढल्याने वीजेच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सोमवारी साडे तीन हजार मेगावॅटची वीज मागणीचा टप्पा पार केला आहे. मागील आठवड्यातील वीजमागणी सरासरी 3200 मेगावॅट दरम्यान असताना सोमवारी 300 मेगावॉटची वाढ दिसली. मुंबईची आजवरची कमाल वीज मागणी एप्रिल 2022 मध्ये 3800 मेगावॅटची होती. साडेतीन हजार वीजेची मागणी ही या मोसमातील सर्वाधिक वीजेची मागणी आहे. यामुळे पुढील काही दिवसात जसा जसा उकाडा वाढत जाऊन वीजेच्या मागणीत देखील यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत सोमवारी तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढली. सोमवारी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा मिळाला.  आज आणि उद्या तर पारा 39 ते 40 पर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठाणे, रायगड, पालघर या जिह्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

मुंबईची वीजेची मागणीही सरासरी 2400 ते 2600 मेगावॅट दरम्यान असते. कोरोनानंतर ही सरासरी 2800 ते तीन हजार मेगावॅटच्या घरात गेली. तर मागील उन्हाळ्यात सरासरी 3200 ते 3300 मेगावॅट दरम्यान होती. यंदा मात्र मुंबईची वीजमागणी तीन हजार मेगावॅटच्या वरच आहे. सोमवारी दुपारी मागणीने 3532 मेगावॉटचा उच्चांक गाठला. हा या मौसमातील आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.