Thane Murder: ठाण्यात कारमध्ये आढळला एका व्यक्तीचा मृतदेह, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड
Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे रविवारी (1 ऑगस्ट) एका कारमध्ये 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला होता. तसेच संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान, मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. या अहवालानुसार, मृत व्यक्तीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस पुढील चौकशी करत आहे.

भिवंडी शहराच्या पोलीस नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी काही प्रवाशांना भिवंडी परिसरातील मानकोली चौकाजवळ गाडीत पडलेला एक व्यक्ती आढळून आला. मात्र, त्याच्या शरिरात कोणतीच हालचाल होत नसल्याने लोकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अवहलानुसार, त्या व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Navi Mumbai: नवी मुंबईत दोन सख्या बहिणींची गळफास लावून आत्महत्या, पोलीस तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती पॉवरलूम कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत होता. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनमुळे त्याने नोकरी गमावली होती. यामुळे तो गेल्या एक महिन्यापासून कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.