Navi Mumbai: नवी मुंबईत दोन सख्या बहिणींची गळफास लावून आत्महत्या, पोलीस तपास सुरू
Representational Image (Photo Credits: Pixabay)

नवी मुबईच्या (Navi Mumbai) ऐरोली (Airoli) परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. पोलिसांना सोमवारी या दोघींचे मृतदेह त्या राहत असलेल्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या दोघींनी आर्थिक परिस्थिती कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला कसून सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

लक्ष्मी पंत्री (वय, 33) आणि स्नेहा पंत्री असे आत्महत्या केलेल्या दोन्ही बहिणींचे नाव आहेत. या दोघी नवी मुंबईच्या एरोली भागातील सेक्टर 10 मधील सागरदर्शन सोसायटीमध्ये राहत होत्या. तसेच या दोघी खाजगी ट्यूशन घेऊन उदरनिर्वाह चालवायचे. मात्र, गेल्या दोन तीन दिवसांपासून दोघी बहिणी घराच्या बाहेर न दिसल्यामुळे शेजारच्यांना संशय आला. तसेच शेजाऱ्यांनी त्यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस दार तोडून आता गेले असता दोघीही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा-Pune: बायकोची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या नवऱ्याला अटक, पुण्यातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघ्या बहिणी घरीच शिकवणी वर्ग घेत होत्या. मात्र, आर्थिक चणचण भासू लागल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडून उधारीने पैसे घेतले होते. सतत पैशांची चणचण भासू लागल्यामुळे दोघ्या जणी नैराश्यग्रस्त झाल्या होत्या. त्यातून राहत्यात घरात गळफास लावून दोघींनी आत्महत्या केली. एका बहिणीने हॉल आणि दुसऱ्या बहिणीने बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ऐरोली पोलीस करत आहे.