Pune: बायकोची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या नवऱ्याला अटक, पुण्यातील घटना
प्रतिनिधी हेतूसाठी वापरलेली प्रतिमा  | (Photo Credits: Unsplash)

बायकोची हत्या (Murder) करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना पुण्यातील (Pune) देहूरोड (Dehu Road) परिसरात रविवारी (1 ऑगस्ट) घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. आरोपी नवऱ्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

वैष्णवी पवार (वय, 22) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वैष्णवी ही आरोपी चेतन पवारसह (वय, 27) देहूरोड सेक्टर नं-26 निगडी प्राधिकरण येथे राहत होती. त्यांच्यात रविवारी मध्यरात्री किरकोळ कारणांवरून भांडण झाले. या भांडणाच्या रागातून चेतन वैष्णवीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगत चेतनने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैष्णवीच्या कपाळावर जखमेच्या खुणा होत्या, ज्यामुळे पोलिसांना खुनाचा संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता चेतनने हत्या केल्याची कबूली दिली आहे. हे देखील वाचा- Palghar: मित्रांसोबत फ्रेन्डशिप डे साजरा करायला गेलेल्या एका मुलाचा धरणात बुडून मृत्यू

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील मांजरीमध्ये असलेल्या स्मशानभूमीत एका तरूणाची हत्या घडली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. एकूण पाच जणांवर हत्येचा आरोप आहे. त्यापैकी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा प्रकार लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असून पोलीस पुढील तपास करत आहेत.