Thane: उद्धव ठाकरे गटातील शाखाप्रमुख दोन वर्षांसाठी 3 जिल्ह्यातून तडीपार, शिंदे गटासोबतच्या संघर्षानंतर पोलिसांची कारवाई
Shiv Sena Dasara Melava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह जरी आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिळाले असले तरी, सुरुवातीच्या काळात शिंदे यांच्या बंडाचे जोरदार पडसाद उमटले होते. प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली होती. ही दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांवर आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयावर दगड भिरकावणाऱ्या तत्कालीन शिवसेना शाखा प्रमुख सुरेश पाटील यांना तडीपार करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली. प्रामुख्याने ठाणे, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातून पाटील यांना तडीपार करण्यता आले आहे.

तडीपार करण्यात आलेला सुरेश बाबुराव पाटील हे ठाण्यातील उल्हासनगर कॅम्प परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख होते. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले असता पाठिमागे काही ठिकाणी उद्रेक झाला. या वेळी सुरेश पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले होते. या घटनेनंतर सुरेश पाटील यांच्यासह त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला होता. (हेही वाचा, Shiv Sena Whip: ठाकरे की शिंदे? व्हीप कोणाचा चालणार? दोन्ही गाटांचा दावा काय? घ्या जाणून)

सुरेश पाटील यांच्यावर या आधी चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी 3 गुन्हे 2022 मध्ये दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची दखल घेत पोलिसांनी कारवाई करुन पाटील याला ठाणे, मुंबई आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे, अशी माहिती उल्हासनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे.

दरम्यान, एका शाखाप्रमुखावर अशा पद्धतीने कारवाई होणे हे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या आधीही ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. कारण नसताना तडीपारी केली जात असल्याचे म्हटले होते. सरकारकडून सूडबुद्धीने राजकारण केले जात असल्याची भावनाही ठाकरे गटातील शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत.