भाजपच्या चेहऱ्यावरील सूज आणि मेकअप दोन्ही उतरले, 'बकवास' थापेबाजीला जनता कंटाळली: शिवसेना
Devendra Fadnavis | (Photo Credits-Facebook)

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसारखा एखाददुसरा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप (BJP) दारुण पराभूत झाला. या पराभवानंतर शिवसेनेने मुखपत्र सामनातून भाजपला खास शैलीत चिमटे काढत टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या. कुठे शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तर, कुठे काँग्रेस (Congress) आणि वंचित आघाडीची सरशी झाली. धुळे वगळता भाजप कुठेच नाही. सगळ्यात धक्कादायक निकाल लागला तो नागपूर जिल्हा परिषदेचा. एकंदरीत महाराष्टातील सत्ता हेच भाजपचे 'टॉनिक होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज (Swelling) उतरली. चेहऱ्यावर असलेला मेककअप (Makeup) उतरला. सत्ता जाताच चेहऱ्यावरची लाली ओसली', अशा शब्दांत शिवसेना मुखपत्रातून भाजपला टोले लगावण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक निकालावर भाष्य करताना दै. सामना संपादकीयामध्ये म्हटले आहे की, राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निकालांनी फुंकली आहे. नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा साह जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यात धुळ्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली आङे. येथे शिवसेनेसह महाविकासआघाडी म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या असत्यात तर भाजप इथेही गटांगळ्या खाताना दिसला असता.

आणखी काय म्हटले आहे सामनात?

नंदुरबारमध्येही काँग्रेसने थोडे हुशारीने घेतले असते व शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेले असते तर, जिल्हा परिषदेतून भाजपचे नामोनिशाण मिटले असते. नंदुरबारची सत्ता भाजपने गमावली आहे. त्याचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली. मुळात नंदुरबारसारख्या जिल्ह्यात भाजपचे स्वत:चे असे काहीच स्थान नाही. राष्ट्रवादीतील विजयकुमार गावीत व इतर 'उपरे' घेऊन त्यांनी जी उधार-उसनवारी केली त्यामुळे भाजपचे झेंडे लागले. पण, कालच्या निवडणुकांतून सत्य काय ते बाहेर आले. (हेही वाचा, Free Kashmir Controversy:विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज; मुंबईत 'फ्री कश्मीर' पोस्टर झळकावणाऱ्या मेहक प्रभू हिचे 'सामना'तून समर्थन)

सगळ्यात धक्कादायक तो नागपूर जिल्हा परषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरी यांच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून, भगवा विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण, नागपूर हा त्यांच्या बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी यतेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या 'बकवास' थापेबाजीला कंटाळली आहे. नागपूरमधील पराभव हा सगळ्यात मोठा दणका आहे. नागपुरात जिथे जिथे फडणवीस प्रचाराला गेले तिथे भाजप उमदवारांचा पराभव व्हावा यास काय म्हणावे? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.