Free Kashmir Controversy | (Photo Credit: Archived, edited, representative images)

जेएनयू (JNU) हल्ल्याचा विरोध करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनात एका मुलीने झळकवलेल्या 'फ्री कश्मीर' (Free Kashmir) पोस्टरवरुन भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. प्रामुख्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांवर टीकेचा भडीमार केला. या टीकेला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयमधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विरोधकांना सध्या समुपदेशनाची गरज आहे. हे सरकार कधीतरी पडेल आणि आपण सत्तेत येऊ असे विरोधकांना वाटत आहे. त्यातून ते आरोपबाजी करत आहेत. परंतू, विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावणे, स्वतःची विश्वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते अशा शब्दांत विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. तर, ज्या मुलीने ‘फ्री कश्मीर’चा फलक झळकवला ती मुलगीच तासाभरात वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर आली व तिने विरोधी पक्षाच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. मुळात ही मुलगी मुसलमान किंवा कश्मिरी नव्हती. शुद्ध मराठीत तिने आपले नाव मेहक प्रभू (Mehak Prabhu) असे सांगितले. त्यामुळे पहिल्या फटक्यातच भगतगण कोलमडले', असे म्हणत हे पोस्टर झळकावणाऱ्या मुलीचे कौतुकही सामनातून करण्यात आले आहे.

सामना अग्रलेखातील काही मुद्दे

फडणवीस सत्ताधाऱ्यांवर रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके वाईट कुणालाच वाटत नसेल. नागरिकता सुधारणा कायदा व ‘जेएनयू’तील निर्घृण हल्ला प्रकरणानंतर देशभरातील तरुण वर्ग संतापून रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन, धरणे वगैरे धरली. त्यात एका मुलीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा कागदी फलक घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला. यावर विरोधी पक्षनेत्यांना धक्का बसला. त्यांच्यातला राष्ट्रभक्त उसळला व त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारलाच धारेवर धरले. काय तर म्हणे, ‘‘पहा, पहा, उद्धव ठाकरे यांच्या नाकासमोर कश्मीरातून फुटून निघण्याचे फलक नाचवले जात आहेत. हा देशद्रोह मुख्यमंत्री ठाकरे यांना मान्य आहे काय?’’ वगैरे वगैरे वगैरे. विरोधी पक्षनेत्यांच्या सुरात सूर मिसळण्यास इतर भगतगणही पुढे आले, पण त्यांचा हा आरोप म्हणजे भंपकपणाचा कळसच ठरला.

ज्या मुलीने ‘फ्री कश्मीर’चा फलक झळकवला ती मुलगीच तासाभरात वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर आली व तिने विरोधी पक्षाच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. मुळात ही मुलगी मुसलमान किंवा कश्मिरी नव्हती. शुद्ध मराठीत तिने आपले नाव मेहक प्रभू असे सांगितले. त्यामुळे पहिल्या फटक्यातच भगतगण कोलमडले. मेहक असे म्हणाली की, ‘जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ले पाहून मी अस्वस्थ झाले व एका कर्तव्यभावनेने गेट वे ऑफ इंडियासमोरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आंदोलनाच्या ठिकाणी अनेक फलक पडले होते. त्यातला एक फलक उचलून मी कॅमेऱयासमोर झळकवला. त्यावर ‘फ्री कश्मीर’चा उल्लेख होता. माझ्या दृष्टीने ‘फ्री कश्मीर’ म्हणजे देशातून फुटून निघणे असा होत नाही, तर आज कश्मीरच्या नागरिकांवर जी बंधने लादली आहेत, त्यांना देशापासून तोडले आहे. (हेही वाचा, मुंबई: 'फ्री कश्मीर' पोस्टरवरुन जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यात ट्विटवॉर)

कश्मिरी जनतेची वेदना एका मुंबईकर मराठी मुलीने मूकपणे मांडली. यावर विरोधी पक्ष म्हणतो हा देशद्रोहच आहे. विरोधी पक्षाच्या बेजबाबदारपणाचे यापेक्षा घाणेरडे उदाहरण दुसरे नसेल. देशाचा जो नागरिक निर्भयपणे भावना व्यक्त करील तो देशद्रोही, असा प्रचार मोदी-शहांचे भगतगण करीत असतील तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत आहेत. फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर संयमाचा बाम चोळून काही काळ शांत राहायला हवे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असे भन्नाट आरोप करून ‘ठाकरे सरकार’ पडणार नाही. उलट तीन पक्ष अधिक घट्ट होतील. हे सर्व करण्यापेक्षा त्यांनी ‘विरोधी पक्षाची जबाबदारी व कर्तव्य’ अशा विषयांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करून त्यात सहभागी व्हायला हवे. ज्याला ‘कौन्सिलिंग’ म्हणतात अशा समुपदेशनाची आज विरोधी पक्षाला गरज आहे; कारण रोज त्यांना वाटते की, सरकार पडेल व आपण पुन्हा येऊ!

दरम्यान, ‘फ्री कश्मीर’ पोस्टरवरुन हे आंदोलन नेमके कोणासाठी आहे. फ्री कश्मीर या घोषणेचा इथे संबंधच काय? अशा प्रकारच्या फुटीरतावाद्यांना मुंबईत आपण सहन कसे करु शकता? असे प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. फडणवीस यांनी हे ट्विट उद्धव ठाकरे यांना टॅग केले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘फ्री कश्मीर’ पोस्टरच्या मुद्द्यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटरवर चांगलेच ट्विटवॉर पाहायला मिळत आहे.