Aaditya Thackeray, Suraj Chavan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोविड-19 महामारी काळात झालेल्या कथित 'खिचडी' वितरण घोटाळ्याशी (Khichdi Scam) संबंधित मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना (यूबीटी) पदाधिकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना जामीन मंगळवारी (4 फेब्रुवारी) मंजूर केला. महत्त्वाचे असे की, जामीन मिळाल्यावर तुरुंगातून बाहेर येताच सूरज चव्हाण शिवसेना (UBT) (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवस्थान असलेल्या मुंबई येथील 'मातोश्री' (Matoshree) या निवासस्थानी दाखल झाले. या वेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची गळाभेट घेतली. चव्हाण हे आपल्या पक्षनेत्याच्या निवास्थानी पोहोचले तेव्हा उद्धव यांच्या पत्नी रश्मी आणि आमदार अनिल परब आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह

शिवसेना (UBT) पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांना कोरोना महामारी काळात कथीत खिचडी वितरण घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती. तब्बल एक वर्षाहूनही अधिक काळ तुरुंगात घालवेल्या चव्हाण यांची जामीनावर सुटका झाल्याने ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सूरज चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहील असे शिवसेना (UBT) नेते सांगत आहेत. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा दिलासा असल्याचेही जाणकार सांगतात. (हेही वाचा, khichdi Scam: शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय Suraj Chavan ला अटक; बीएमसी कोविड सेंटर खिचडी घोटाळ्याप्रकरणी ED ची कारवाई)

न्यायालयाचे जामिनावर निरीक्षण

चव्हाण यांनी आधीच एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला आहे आणि खटला नजीकच्या भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला. न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी जामीन अर्ज मंजूर करताना यावर भर दिला की, दीर्घकाळापर्यंत अटक केल्याने चव्हाण यांचा भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जलद खटला आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार भंग होईल. 'जर अर्जदाराची अटक कायम ठेवली तर तर ते कलम 21अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल', असेही न्यायालयाने म्हटले. (हेही वाचा: Uddhav Thackeray Maha Patrakarparishad: 2013 च्या शिवसेनेच्या घटनादुरूस्ती च्या ठरावाचा व्हीडिओ महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंकडून सादर)

सूरज चव्हाण यांच्याविरुद्ध आरोप

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जानेवारी 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाची युवा शाखा असलेल्या, युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य सूरज चव्हाण यांना अटक केली. हा खटला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालातून (FIR) सुरू झाला आहे. (हेही वाचा, Shiv Sena (UBT) BJP Alliance: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिलींद नार्वेकर यांचा युतीवरुन सवाल; चंद्रकांत पाटील यांचे दिलखुलास उत्तर)

'खिचडी घोटाळा': प्रकरण काय आहे?

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना खिचडीचे पॅकेट वाटण्यासाठी फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला 8.64 कोटी रुपये वाटप केले.
  • सदर खिचडी वाटपामध्ये ईडीने 3.64 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ईडीने असाही असा दावा केला आहे की, 1.25 कोटी रुपये सूरज चव्हाण यांच्या वैयक्तिक बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत, तर 10 लाख रुपये त्यांच्या भागीदारी फर्म, फायर फायटर्स एंटरप्रायझेसमध्ये जमा करण्यात आले आहेत.
  • केंद्रीय एजन्सीने केलेल्या दाव्यानुसार, चव्हाण यांनी 'गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्ना'पैकी 11.35 कोटी रुपये मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वापरले आहेत.

सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना आणि निकटवर्तीयांना विविध आरोपांखाली कारागृहात जावे लागले. ज्यामध्ये खासदार संजय राऊत, सदानंद कदम सूरज चव्हाण यांचा समावेश आहे.