
Student Ragging Case : रॅगिंगला ( Ragging)कायद्याने बंदी आहे. मात्र तरीही, अनेक कॉलेजांमध्ये रॅगिंगचे प्रकार घडताना दिसतात. काहीजणांना त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. असाच जीवघेणा प्रकार लोणावळ्यातील एका नामांकित कॉलेजमधून समोर आला आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या रॅगींगला कंटाळून एका विद्यार्थीनीला ब्रेन स्ट्रोकला (Brain Stroke)सामोर जावं लागलं आहे. तिच्यावर सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, होणाऱ्या त्रासाबाबत विद्यार्थीनीने (Student)हॉस्टेल प्रशासनापासून पोलिसांपर्यंत सांगूणही तिच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिले नाही. अखेर आता ती रूग्णालयात आपल्या जीवनासाठी लढा देत आहेत. (हेही वाचा :Students Ragging Case Thane: ठाणे येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांचे रॅगिंग प्रकरणात निलंबन )
प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. ती ओलांडली की जीवावर बेतू शकते. असं हे उदाहरण आहे. पीडित दिव्यांग विद्यार्थिनी ही BBA/CA च्या दुसऱ्या वर्षासाठी शिक्षण घेत आहे. त्यासाठी ती तेथीलच मुली़च्या हॉस्टेलमध्ये रहात होती. रॅगींगचा प्रकार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होता. याकाळात तिला प्रचंड त्रास दिला गेला. तिला अक्षरश: बाथरूममध्ये अनेक वेळा कोंडून ठेवलं जायचं, काही विद्यार्थिनी तिच्या मागे चाकू घेऊनही धावायच्या. या सर्वांचा पीडित विद्यार्थीनीला खूप मानसिक त्रास होत होता. चाकूच्या प्रकरणांत तर तिला दोन वेळा चाकूही लागला, ही बाब तिने तिच्या पालकांना सांगितली.(हेही वाचा :Palghar Ragging Case: पालघर येथील जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांवर रॅगींग; चौकशी सुरु )
पालकांना ही धक्कादायक गोष्ट समजतातच त्यांनी हॉस्टेल वॉर्डनकडे तक्रार केली. मात्र,त्याचा काहीच फरक पडला नाही. त्यानंतरही धमकावण्याचे प्रकार सुरूच होते. त्यानंतर पालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तिथेही तक्रार दाखल केली. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. रॅगिंगचे प्रकार पीडितेला सहन न झाल्याने तिला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला. तिच्यावर पिंपरी- चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर विद्यार्थीनीचे पालक आणि नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. दोषी मुलींवर वेळीच कारवाई केली असती तर आमच्या मुलीवर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.