Palghar Ragging Case: पालघर येथील जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांवर रॅगींग; चौकशी सुरु
Representational image (Photo Credits: pxhere)

Jawahar Navodaya Vidyalaya Ragging Case: ठाणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या रॅगिंग प्रकरणात कारवाई झाल्यानंतर आता पालघर जिल्ह्यातूनही अशाच प्रकारचे प्रकरण पुढे येत आहे. पालघर येथील केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग ( Palghar Ragging Case) झाल्याची घटना पुढे येत आहे. वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता आकरावीच्या विद्यार्थ्यांनी खालच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा दिली. ही शिक्षा रॅगिंग प्रकारातून घडल्याचे समजते. सदर प्रकार 30 सप्टेबर रोजी घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

पालघर येथे जवळपास 32 एक परिसरात जवाहर नवोदय विद्यालय आहे. या विद्यालातील 'उदयगिरी हाऊस' या वसतिगृहातील तीन मुलांवर वरिष्ठ विद्यार्थ्यांनी (इयत्ता 11 वी) रात्री 11.00 वाजणेयच्या सुमारास मारहाण केली. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर घडला प्रकार उघडकीस आला. प्रशासनाने तक्रारीची गंभीर दखल घेऊन अँटी रॅगिंग समितीद्वारे चौकशी सुरु केली आहे. विद्यालयात जवळपास 560 विद्यार्थी शिक्षण घेत असतात. विद्यालयात रॅगिंग प्रकरणाची दखल घेण्यासाठी सात सदस्यांची समिती आहे.

'उदयगिरी वसती गृहातील' विविध विद्यार्थ्यांनी तीव्र स्वरुपात शारीरिक वेदना होत असल्याच्या तक्रारी केल्या त्यानंतर त्यांच्यासोबत मारहाण घडल्याचा प्रकार पुढे आला. वसतिगृहातील वैद्यकीय विभागाने प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यानंतर पालकांशी झालेल्या संवादात विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत रॅगिंग झाल्याचे सांगितले आणि प्रकरणाला वाचा फुटली.

दरम्यान, पीडित विद्यार्थ्यासोबत इतरही दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याची तक्रार केली. त्यांनी सांगितले की, तीन सीनिअर विद्यार्थ्यांनी त्यांना एकाच वेळी अनेकदा कानाखाली मारल्या. ज्यामुळे त्यातील एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला. स्वत:ला सीनिअर समजणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मुलांना आपल्या खोलीत बोलावले होते. मात्र, त्यांना यायला उशीर झाल्याने त्यांनी त्यांना मारहाण केली. यासोबतच या तीनही विद्यार्थ्यांनी या मुलांना घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता करु नका असे सांगितले. तसेच, गणवेश आणि बूट यावरुनही ओरडा दिला.

शालेय शिक्षण आणि साक्षरता (मानव संसाधन विकास मंत्रालय) विभागांतर्गत येणारी आणि स्वायत्त संस्था असलेल्या नवोदय विद्यालय समितीच्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालय सहायक आयुक्त माधुरी शंकर यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी या शाळेला सोमवारी भेट देऊन, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, विद्यालयात रॅगिंग घडले किंवा नाही याचा अहवालही मी सादर करेण असेही ते म्हणाले. शिवाय या प्रकरणा विद्यार्थ्यांशीही संवाद साधला जात आहे. दरम्यान, विद्यालय प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता प्रिन्सिपल अब्राहम जॉर्ज यांनी कॉल अथवा मेसेजला प्रतिसाद दिला नसल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

कोणासोबत रॅगिंग झाल्यास 1800-180-5522 या टोलफ्री क्रमांकावर 24 तासात केव्हाही तक्रार करता येते. शिवाय helpline@antiragging.in या इमेल आयडीवर तक्रारही करता येते असे तज्ज्ञ सांगतात.