Solapur Horror: आईने 2 मुलांची हत्या करून स्वतःला लावून घेतला गळफास; सोलापूरमधील धक्कादायक घटना, कारण अस्पष्ट
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Solapur Horror: महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) येथून हत्या आणि आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका आईने आपल्या घरात दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली आहे. या महिलेने आधी आपल्या मुलांना गळफास देत त्यांची हत्या केली, त्यानंतर स्वतः गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना मुळीगाव रोडजवळील सरवदे नगर परिसरात ही घडली. स्नेहा संतोष चिल्लाल (वय 30), संध्या संतोष चिल्लाल (वय 11), मनोजकुमार संतोष चिल्लाल (7) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, मात्र स्नेहाने हे कठोर पाऊल उचलण्यास प्रवृत्त करण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्नेहाने आधी मुलांना लटकवले असावे आणि नंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. कामावर गेलेल्या पतीने घरी फोन केला होता मात्र कोणीच फोन उचलला नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनही फोन उचलला गेला नसल्याने तो घरी पोहोचला, तिथे तिघेही लटकलेल्या अवस्थेत दिसले.

त्यानंतर त्याने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. स्नेहा आणि तिच्या मुलांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. माध्यमांशी बोलताना स्नेहाच्या पतीने घरात कोणताही वाद नसल्याचे सांगितले. त्यामुळे या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. (हेही वाचा: Mumbai Man Dies in Rehab: टिटवाळा व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तीचा मृत्यू; कुटुंबीयांकडून कर्मचाऱ्यांवर हत्येचा आरोप)

दरम्यान, अशीच एक घटना जून 2023 मध्ये जयपूरमध्ये समोर आली होती, जिथे एका आईने आपल्या चार मुलांना पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये बुडवून त्यांची हत्या करून, नंतर आत्महत्या केली होती. ही महिला 4 महिन्यांची गर्भवती होती. माहितीनुसार, हिराराम मेघवाल यांची पत्नी उर्मिला (27) यांनी त्यांच्या मुली भावना (8), विमला (3), मनीषा (2) आणि मुलगा विक्रम (5) यांना पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये ढकलले व ड्रमला बाहेरून कुलूप लावले, त्यामुळे मुले ड्रममधून बाहेर पडू शकली नाहीत. पतीसोबत असलेल्या वादातून महिलने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.