Mumbai Man Dies in Rehab: टिटवाळा व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तीचा मृत्यू; कुटुंबीयांकडून कर्मचाऱ्यांवर हत्येचा आरोप
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Rehab Centre In Titwala: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात येणाऱ्या टिटवाळा येथील व्यसनमुक्ती केंद्रात एका 39 वर्षी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी मात्र केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे मृत्यूसंबंधी संशय वाढला आहे. चंदन खारवा असे या व्यक्तीचे नाव आहे. केंद्रात उपचार घेत असताना गुरुवारी रात्री उशीरा तो मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

मृतास दारुचे व्यसन

मुंबई सेंट्रल येथील रहिवासी असलेल्या चंदन खारवा याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला दारुचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वीच त्याला टिटवाळा येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. भाऊ चंपक खारवा यांना व्यसनुक्ती केंद्रातून आलेल्या फोनमुळे चंदन याच्या मृत्यूबाबत माहिती मिळाली. दरम्यान, कुटुंबीयांना चंदन याच्या शरीरावर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळल्या. ज्यातील काही जखमा तीक्ष्ण हत्याराने केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचे दिसत होते. जखमांच्या खुणांचा रंगही बदललेला आणि वेगळा दिसत होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालातही शरीरावर जखमा आढळून आल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Titwala Rape Case: टिटवाळा रेल्वे स्थानकात महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत)

खारवा कपड्यांचे व्यापारी

चंदन खारवा हे कपड्यांच्या व्यापाऱ्यात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 10 वर्षांचा अपंग मुलगा आणि आईवडील, भाऊ असा परिवार आहे. खारवा कुटुंबीयंनी जेजे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. टिटवाळा पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल करण्याचाही ते विचार करत आहेत. (हेही वाचा, Titwala Crime: पतीची हत्याकरून पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव, टिटवाळ्यात खळबळ .)

व्यसनमुक्ती केंद्राकडून आरोपांचे खंडण

दरम्यान, चंदन खारवा यांच्या हत्येच्या आरोपांना उत्तर देताना व्यसनमुक्ती केंद्राशी संबंधीत एमएच फाऊंडेशनचे अध्यक्ष रझा रिझवी यांनी म्हटले आहे की, खरवाच्या मृत्यूमध्ये केंद्र अथवा केंद्रातील कोणत्याही कर्मचाऱ्याचा कोणताही सहभानाही. त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानेच त्याचा मृत्यू झाला आहे. रिझवी यांनी संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावताना केंद्राचा नावलौकीक, सामाजिक प्रतिमा आणि इतर गोष्टींवरही भर दिला.

खारवा कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. या प्रकरणाबाबतचा गुन्हा जेजे पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला जातो की तो टिटवाळा येथे नोंदवला गेला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, खारवा कुटुंबीयांना चंदन यांच्या आकस्मीक मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. खास करुन आई-वडील आणि पत्नीला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला आहे. पोलीस तपासात अनेक गोष्टी पुढे येथील, असा विश्वास कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.