Fishing Boat | Representational image (Photo Credits: pixabay)

मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या खलाशांमध्ये (Fisherman) बोटीवर झालेल्या वादातून एका खलाशाने स्वत:ला पेटवून घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात सोमवारी (11 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. बोटीवरील खलाशांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यातून एकाने बोटीवरील पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवले. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी इतर खलाशी धावले. मात्र, त्या खलाशाने पेटत्या अंगानेच बोटीच्या मागे असलेल्या जाळीत उडी घेतली.

बोटीला लागली आग

खलाशाने पेटत्या अंगानेच जाळीत उडी घेतल्याने जाळीनेही पेट घेतला. परिणामी बोटीला आग लागली. ज्यामुळे बोटीचे मोठे नुकसान झालेच. परंतू, खलाशाचाही मृत्यू झाला. बोटीवरील इतर खलाशांनी केबीन तोडून पीडित खालाशाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. यामध्ये मदतीसाठी गेलेल्या खलाशांनाही मोठ्या प्रमाणावर भाजले असून, त्यांना दुखापतही झाली आहे. देवगड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. (हेही वाचा, Mumbai News: वर्सोवा किनारपट्टीच्या समुद्रात बोट उलटल्याने 2 मच्छिमार बुडाल्याची भीती; शोध मोहिम सुरू)

मच्छीमारांमध्ये हद्दीवरुन वाद

खोल समुद्रात आणि किनारपट्टीलगत मासेमारी करण्यावरुन मच्छीमारांमध्ये होणारे वाद नवे नाहीत. या आधीही मच्छीरांमध्ये हाणामारी आणि हिंसक घटा घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने या घटना पारंपरीक मच्छीमार आणि एलईडी आणि बुल नेट मच्छीमार यांच्यात हद्दीतील वादावरुन होत आहेत. एलईडी आणि बुल नेट मासेमारी कायद्याने अवैध आहे. अशा प्रकारच्या मच्छिमारीला मान्यता नाही. त्यामुळे बेकायदेशीर मच्छिमारी आणि मच्छिमारांमध्ये होणारे वाद यांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचा मत्स विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, यूके येथील मच्छिमाराने पकडली 67 पौंड वजनाची जगातील सर्वात मोठी Goldfish, पाहा फोटो)

काय आहे एलईडी मच्छीमारी

मच्छीमारी करताना मासे आकर्षित करण्यासाठी एलईडी दिवे वापरले जातात. LED दिवे बहुतेक 1600 वॅट आणि 5000 वॅट्सच्या दरम्यान वापरले जातात. जे 10 किमी पर्यंत मासे आकर्षित करू शकतात, असे सांगितले जाते. एलईडी प्रकाश पाहून मासे आकर्षित होता. ज्यामुळे त्यांना पकडणे बोटीवरील खलाशांना सोपे जाते. परंतू, अशा प्रकारची मच्छीमारी करण्यास कायदेशीर परवानगी नाही. केवळ पैशांच्या हव्यासासाठी काही मोठे व्यापारी आणि मच्छीमार या अवैध मार्गांचा वापर करतात. बेसुमार मच्छिमारी केल्याने समुद्रातील माशांचे प्रमाण आणि प्रजातीही संपण्याची शक्यता या मच्छिमारी मुळे निर्माण होते. तसेच,सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होते. शिवाय, मासेमारीसाठी एलईडी दिव्यांचा वापर केल्याने तीव्र उष्णता निर्माण होते ज्यामुळे मासे खराब होतात आणि लहान मासे मरतात. केवळ राज्यच नव्हे तर केंद्र सरकारनेही किनारी भागात मासेमारीसाठी एलईडी दिवे वापरण्यास बंदी घातली आहे.