भाजप शिवसेना युतीचे साईड इफेक्ट: पहिला फटका सेनेला, जिल्हा समन्वयकाचा पक्षाला जय महाराष्ट्र
Side Effect of BJP Shiv Sena Alliance | (Photo credit: archived, edited, representative image)

Lok Sabha Election 2019: एकमेकांवर तीव्र टीकेचे प्रचंड प्रहार करुन आणि स्वबळाची जाहीर भाषा करुनही शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) या दोन्ही पक्षांनी गळ्यात गळे घालत युतीचा निर्णय घेतला. परंतू, युतीचा निर्णय दोन्हीही पक्षांतील कार्यकर्त्यांच्या अद्यापही गळी उतरला नाही. स्वबळाच्या घोषणेमुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये स्वतंत्र लढण्याची मानसिकता तयार झाली असतानाच पक्षनेतृत्वाने युतीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे मोठे पडसाद दोन्ही पक्षांमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत. युतीच्या निर्णयाचा पहिला फटका शिवसेनेला बसला. अहमदनगर जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय गुरुवारी (21 फेब्रुवारी) घेतला. शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यावर घनश्याम शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशकर्ते होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना भाजप युती (BJP Shiv Sena Alliance) सांभाळता न आल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या पक्षांना होऊ शकतो.

2014मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही युती तोडून स्वबळावर लढले. यात भाजपने अधिक जागा जिंकल्या. त्या तुलनेत शिवसेनेला कमी जागा मिळाल्या. त्यानंतर नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मात्र, सत्तेत राहूनही शिवसेनेने विरोधकांची भूमिका वटवली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या भूमीकेचे शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोशात स्वागत केले. दरम्यानच्या प्रदीर्घ काळात शिवसैनिकांनी स्वतंत्र (स्वबळावर) लढण्याची पूरेपूर मानसिकता आणि तयारी केली. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये ही कट्टरता अधिक आहे.

दुसऱ्या बाजूला, शिवसेनेच्या स्वबळाच्या भूमिकेला भाजपकडूनही स्वबळाचा नारा देत प्रत्युत्तर मिळाले. परंतू, भाजपचे नेते एका बाजूला स्वबळाची भाषा करत होते. पण, दुसऱ्या बाजूला भाजपमधीलच काही नेते युती होणारच असे छातीठोकपणे सांगत होते. अखेर शिवसेना, भाजप शिवसेना युती झाली. (हेही वाचा, 'तर युती तोडू' भाजप-शिवसेना युतीला निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच हादरा)

दरम्यान, घनश्याम शेलार यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, स्थानिक नेत्यांमध्ये स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. तसेच, कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची पूर्ण मानसिकता झाली होती. मात्र, आयत्या वेळी पक्षनेत्यांनी युतीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्वत: घनश्याम शेलारही युतीच्या निर्णयामुळे नाराज होते. युतीचा निर्णय घेत असताना राज्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत आहोत असे शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पक्षांतर हा घनश्याम शेलार यांचा इतिहास आहे. सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षात होते. पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे शिवसेना पक्षात गेले. आता युतीचा निर्णय न पटल्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याचे समजते.