राजकीय गरजेतून भाजप-शिवसेनेने युतीची घाईघाईने घोषणा केली खरी. पण, ही युती खरोखरच मनापासून की केवळ दिखावा असा प्रश्न काही तासांमध्येच उठण्यास सुरुवात झाली आहे. भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) नेत्यांनी परस्परविरोधी वक्तव्ये केल्यामुळे हा प्रश्न तयार झाला आहे. विद्यमान महसूलमंत्री मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या फॉर्म्युल्यावर कोल्हापूर येथे वक्तव्य केले. त्याला पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत रामदास कदम यांनी थेट युती तोडू अशी धमकी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी भाजपला हा ईशारा दिला आहे. रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, 'मी काल चंद्रकांत पाटील यांची मुलाखत पाहिली. या मुलाखतीत त्यांनी युती आणि मुख्यमंत्री पदाबाबत काही विधाने केली. त्यातील एक विधान होते की, ज्या पक्षाचे अधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री. पाटील यांचे हे विधान पूर्ण चुकीचे आहे. त्यांनी विधान करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्षाध्यक्ष शाह यांच्याशी बातचीत केली असती तर, त्यांना युतीचा फॉर्म्युला समजला असता. कोणतेही विधान करण्यापूर्वी योग्य ती माहिती घ्यावी नाहीत अशा वक्तव्यांमुळे युतीच तुटायची, असे कदम यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, अखेर भाजप-शिवसेना युती झालीच, जनभावनेचा आदर राखत आगामी निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय)
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, आमदार कोणाचे कितीही निवडूण आले तरी, दोन्ही पक्षांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद घ्यायचं असं युतीच्या चर्चेत ठरले आहे. युतीच्या चर्चेवेळी शिवसेनेकडून ही अट होती. भाजपने युतीच्या अटी पाळल्या नाहीत तर, उद्धव ठाकरे यांना सांगू की युती तोडून टाका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युती झाली खरं. पण, सत्तेच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच युतीला तडे जाणार की काय असा संशय निर्माण झाला आहे.