शिवडी विधानसभा मतदारसंघात (Shivadi Assembly Constituency) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे उमेदवार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना पाठिंबा देण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढविणाऱ्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षास या मतदारसंघात उमेदवारच मिळाला नसल्याने त्यांना इतरांच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागत आहे. याच मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने आपण भाजप पुरस्कृत असल्याचा दावा केला होता. मात्र, तो फेटाळून लावत आमचे कार्यकर्ते हे मनसेच्या उमेदवाराचा प्रचार करतील असे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार () यांनी जाहीर केले. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या नंतर भारतीय जनता पक्षाने आणखी एका मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
भाजप कार्यकर्त्यांनो रेल्वे इंजिन घराघरात पोहोचवा
आशिष शेलार यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले की, या निवडणुकीत मनसे उमेदवाराचा प्रचार करा. हा निर्णय केवळ शिवडी मतदारसंघापुरताच मर्यादित आहे. तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी मनसेचं रेल्वे इंजिन घराघरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. बाळा नांदगावकर यांचा कसून प्रचार करा, असे अवाहनच शेलार यांनी केले आहे. (हेही वाचा, Chhatrapati Shivaji Maharaj Temple: छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर सूरत येथे उभारणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा)
बाळ नांदगावकर यांना भाजपचा पाठिंबा
विशेष म्हणजे, माहीम विधानसभा मतदारसंघातही भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे चिरंजीव अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. धक्कादायक असे की, भाजप महायुती म्हणून शिवसेना पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवते आहे. माहीममध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार सदा सरवणकर उभे आहेत. उल्लेखनीय असे की, सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. असे असतानाही सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी भाजपची इच्छा होती. दुसऱ्या बाजूला ते शक्य झाले नाही. सरवणकरांनी आपला अर्ज मागे न घेता कायम ठेवला. असे असताना भाजपने थेट मनसेला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे वागणे हे युतीधर्माला धरुन होते का? असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही काही ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष संगणमताने एकमेकांसोबत असल्याची चर्चा राजकीयव वर्तुळात आहे. (हेही वाचा, Sharad Pawar यांचे महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या तोंडावर संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत? 'आता कोणतीच निवडणूक लढणार नाही' (Watch Video))
दरम्यान, शिवडी विधानसभा मतदारसंघातही काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. कारण अजय चौधरी यांना शिवसेनेने तिकीट दिले असले तरी, शिवसेना पक्षाचे स्थानिक नेतेही इच्छुक होते. अशा वेळी दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई करण्यास नेतृत्वाला यश आले. ज्यामुळे हे दोन्ही नेते या निवडणुकीत एकत्र प्रचार करताना दिसत आहेत.