कोकणातील भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार (Former BJP MLA Pramod Jathar) यांनी कोकणातील नाणार प्रकरल्पाचे (Nanar Refinery Project, Konkan) समर्थन केले असून, हा प्रकल्प व्हायला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena supremo Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले असून, मुख्यमंत्रे देवेंद्र फडणवीस यांना 'जठाराग्नी' वेळीत शांत करण्याचा सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी 'एक-एक खासदाराचे महत्त्व सध्या श्री. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आहे. फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते याचे भान ज्यांना नाही ते देश व समाजाचे मारेकरी आहेत. क्षुद्र स्वार्थ व जमीन व्यवहारातील मलिदा यासाठी नाणार विष प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही', असे असा गर्भित इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांना दिला आहे. तसेच, जठार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करताना नाणार प्रकल्पाचे समर्थन करणे 'हा नीचपणा जितका आहे तितकाच निर्घृणपणा आहे', असे म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनामध्ये (Daily Saamana) ' नाणारचा ‘विष’प्रयोग, ‘जठाराग्नी’ शांत करा!' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.
काय म्हटले आहे सामनात
- शिवसेना-भाजप ‘युती’वर शिक्कामोर्तब होताना असे ठरले आहे की, रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषदेतच स्पष्ट केले, स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध असल्याने हा रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत होणार नाही, पण तो इतरत्र हलवला जाईल. तरीही एखादा चिल्लू-पिल्लू उठतो व नाणार प्रकल्पाच्या समर्थनासाठी भाडोत्री जमवाजमव करतो. ही कोकणच्या मातीशी, परशुरामाच्या भूमीशी गद्दारी आहे.
- कोकणच्या विकासाला विरोध करण्याचा दळभद्रीपणा शिवसेना कधीच करणार नाही. विरोध आहे तो विनाशकारी आणि विषारी प्रकल्पांना. कोकणचा निसर्ग, आंबा, फळबाग, शेती, समुद्र, मच्छीमारी यांचा विनाश नाणारसारख्या विषारी प्रकल्पाने होणार असेल आणि त्यातून विष खाऊन मरण्याची वेळ कोकणच्या भूमिपुत्रांवर येणार असेल तर शिवसेना अशा विषारी प्रकल्पांना विरोध करणारच.
- हा प्रकल्प म्हणजे सोन्याची खाण आहे व राजापुरात रिफायनरी येताच कोकणातील घराघरातून सोन्याचा धूर येईल असे चित्र निर्माण करून कोकणवासीयांच्या जमिनी लाटण्याचा हा प्रकार आहे.
- नाणार रिफायनरी प्रकल्पास आधी स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले. रिफायनरीविरोधात लोक मरण्या-मारण्यासाठी तयार झाले. या तीव्र भावनांची दखल घेऊन शिवसेनेने त्यास पाठिंबा दिला. (हेही वाचा, भाजप शिवसेना युतीचे साईड इफेक्ट: पहिला फटका सेनेला, जिल्हा समन्वयकाचा पक्षाला जय महाराष्ट्र)
- महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे आहेत व नाणार होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या प्रकल्पासाठी जी भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे तीदेखील निवडणूक आचारसंहितेपूर्वीच मागे घेतली जाईल असेही स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही नाणार समर्थनाची मोर्चेबांधणी केली जात आहे.
- नाणार विष प्रकल्पाचे हे समर्थक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, इतकेच नव्हे तर हा विषारी प्रकल्प व्हायलाच पाहिजे असे ठणकावून सांगणार आहेत. हा नीचपणा जितका आहे तितकाच निर्घृणपणा आहे.
- पालघर जिल्हय़ातील तारापूर प्रकल्पामुळे सध्या त्या परिसरात भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. या अणुऊर्जा प्रकल्पामुळे कॅन्सरसारखे आजार वाढले आहेत. जमिनीतून व पिण्याच्या पाण्यातून विष निघत आहे व समुद्रही विषारी झाला आहे.
- एक-एक खासदाराचे महत्त्व सध्या श्री. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आहे. फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते याचे भान ज्यांना नाही ते देश व समाजाचे मारेकरी आहेत. क्षुद्र स्वार्थ व जमीन व्यवहारातील मलिदा यासाठी नाणार विष प्रकल्पाचे समर्थन करणाऱयांना जनता माफ करणार नाही.