Aaditya Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शाळेत असताना तुमचे स्वप्न काय होते? असा प्रश्न मोठा राजकारणी, सेलिब्रेटी, खेळाडू अथवा कोणालाही विचारला जातो. एका कार्यक्रमात शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाही तो विचारला गेला. या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी शाळेत असताना आपण पाहात असलेल्या स्वप्नावर भाष्य केले. ते म्हणाले मला व्हायचे होते आंतराळवीर. मी तिसरीत किंवा चौथीत असे. त्या वेळी मला (NASA) किंवा इस्रो (ISRO) द्वारे आंतराळात जायचे होते. मात्र, पुढे मला कळले की त्यासाठी भौतिकशास्त्र (Physics) आणि गणिताचा अभ्यास करावा लागतो. हे कळताच माझ्या आंतराळवीर होण्याच्या स्वप्नांना गळती लागली. मग पुढे मी राजकारणात आलो.

आदित्य ठाकरे यांनी आपण राजकारणात कसे आलो याबाबतही मजेशीर भाष्य केले. ते म्हणाले आंतराळवीर होण्याचे स्वप्न गळू पडले. नंतर मी ठरवले की आपण राजकारणात जायचे. कारण राजकारणात जाण्यासाठी काहीच लागत नाही. त्यामुळेच आपण राजकारणात आलो असेही आदित्य ठाकरे यांनी मिष्कीलपणे सांगितले. राजकारणात आले तेव्हा आदित्य ठाकरे अगदीच पोरसवदा होते. ते प्रत्येक नेत्याचा उल्लेख काका असे करत. नंतर त्यात बदल होत गेला. पक्षानेही त्यांच्यावर हळूहळू मोठी जबाबदारी सोपवली. आदित्य ठाकरे हे सुद्धा हळूहळू आपला पाया भक्कम करत उद्धव ठाकरे यांच्यावरील जबाबदारी हळूहळू आपल्याकडे घेत आहेत. सध्या त्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेने दिली आहे. (हेही वाचा, Aaditya Thackeray Birthday Special: राजकारणाच्या पलिकडे आदित्य ठाकरे हे नाव काय आहे? काव्यसंग्रह ते Youtube Video पर्यंत जाणुन घ्या माहित नसलेल्या गोष्टी)

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये आदित्य ठाकरे हे संसदीय राजकारणात उतरले. या आधी ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढवली नव्हती. आदित्य ठाकरे हे त्याला अपवाद ठरले. आदित्य यांच्याकडे महाविकाआघाडी सरकारमध्ये पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रालय अशा खात्यांचा कारभार आला. मंत्री म्हणून काम करत असताना सुरुवातीला ते कोणत्याही प्रकारे टीकात्मक बोलणे टाळायचे. आपले मंत्रालय आणि आपण असेच त्यांच्या कामाचे स्वरुप होते. मात्र, अलिकडील काही काळात त्यांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा युवा आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.