'शिवसेना सोबत घ्या पण, भाजपला सत्तेतून बाहेर ढकला'; शरद पवार यांनी सांगितले महाविकासआघाडी सरकार स्थापनेचे कारण
Sharad Pawar (Photo Credits: Getty)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला पुष्टी देणारे विधान केले आहे. शिवसेना पक्षाला सोबत घ्या. पण, महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून रोखा असा अल्पसंख्याक समुदयाच्या प्रतिनिधींचा सूर होता. त्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचे महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेवर आल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. भाजप हा मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यात यावे असा मुस्लिम बांधवांचा आग्रह होता. म्हणूनच आम्ही शिवसेनेसोबत सत्तासहभागी झालो, असे विधान अशोक चव्हाण यांनी नुकतेच केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अल्पसंख्यक सेल पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाविकासआघाडी सरकार कसे सत्तेवर आली याबाबत उहापोह केला.

या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अल्पसंख्यक प्रतिनिधिंचा असा सूर होता की, भाजप हा मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे काहीही करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवा. हवे तर शिवसेना सोबत घ्या पण भाजपला सत्तेतून बाहेर ढकला, असा आग्रह अल्पसंख्याक प्रतिनिधींनी धरला होता. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा पक्षाने शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. (हेही वाचा, प्रशासनाला सरकार बदलल्याची कल्पनाच नाही, विधिमंडळ दिनदर्शिकेवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र)

विधानसभा निवडणूक 2019 शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष युती करुन तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस हे पक्ष आघाडी करुन लढले होते. शिवसेना भाजप युतीला जनतेने कौल दिला. दोन्ही पक्षांचे मिळून 161 आमदार निवडून आले. त्यामुळे युतीला बहुमत मिळाले. परंतू, मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये ताण वाढला. हा ताण इतका वाढला की शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या दोन्ही पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले.