प्रशासनाला सरकार बदलल्याची कल्पनाच नाही, विधिमंडळ दिनदर्शिकेवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यात सरकार बदलून आता जवळपास दोन महिने होत आले. परंतू, विधिमंडळ प्रशासन अद्यापही जुन्या सरकारच्याच स्मृतिंमध्ये वावरत असल्याचे पुढे आले आहे. निमित्त ठरले आहे. विधिमंडळ दिनदर्शिकेचे ( Maharashtra Legislature Calendar). राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पदग्रहण केले असतानाही विधिमंडळाच्या दिनदर्शिकेवर मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेच छायाचित्र छापले गेले आहे. विधिमंडळ दिनदर्शिका 2020 च्या जानेवारी महिन्याच्या पानावर हे छायाचित्र दिसत आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या ऐवजी आगोदरचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे छायाचित्र छापले आहे. त्यामुळे विधिमंडळ प्रशसनाच्या या कारभारावर टिका होऊ लागली आहे.

विधिमंडळाच्या दिनदर्शिकेवर इतरही विविध पदांवर जुनेच चेहरे दाखविण्यात आले आहेत. जसे की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील तर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून प्रविण दरेकर यांच्याऐवजी धनंजय मुंडे यांचे छायाचित्र दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विधिमंडळ प्रशासनाला सरकार बदलल्याची कल्पना आहे की नाही असा सवाल विचारला जात आहे. (हेही वाचा, स्वत:चे कान पकडत शिशिर शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन)

विधानसभा निवडणूक 2020 नंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. ज्याचे राज्याच्या राजकारणाचा इतिहात पहिल्यांदाच असे वर्णन केले गेले. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींची केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभर चर्चा झाली. प्रचंड संघर्ष, नाट्यमयता, उत्सुकता आणि राजकीय शह-काटशहांनी भारलेल्या वातावरणात महाराष्ट्रात सत्तांतर घडले. त्यामुळे या सत्तांतराची राजकीय वर्तुळच काय अगदी शहरातील गल्ल्या, नाके आणि गावातील चौकाचौकांतही चर्चा रंगली. परंतू या सर्व घडामोडींची कल्पना विधिमंडळातील प्रशासनाला कशी आली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, विधिमंडळ प्रशासनाने छापलेल्या दिनदर्शिकेची पानं सरकारस्थापनेच्या आगोदरच छापली होती काय? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.