राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. या विधानांमुळे शरद पवार यांच्या राजकीय भूमकांवरही प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. शरद पवार हे खरोखरच महाविकासआघाडीत आहेत का इथपासून ते एकाच वेळी सत्तेत आणि विरोधी पक्षात तर नाहीत ना? इथपर्यंत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा संभ्रम कायम असतानाच दुसऱ्या बाजूला शरद पवार गट जोरदार आक्रमक झाला आहे. या गटाने अजित पवार यांच्यासह नऊ आमदार आणि दोन खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा सभापतींना पक्ष दिल्याचे समजते.
भाजपसोबत हातमिळवणी केलेल्या आणि थेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर थेट अनुसूची 10 अन्वये अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी या पत्रात केल्याचे समजते. मात्र, या पत्रावर अत्याप कोणती कारवाई झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे वरवर पाहता शरद पवार यांनी यु-टर्न घेतला, घुमजाव केले असे त्यांच्या विधानावरुन वाटत असले तरी ते आपल्या भूमकेवर ठाम असल्याचे ते कृतीतून दाखवत असल्याचे पुढे येत आहे.
परत संधी द्यायची नसते आणि मागायची देखील नसते
शरद पवार यांनी सातारा येथे बोलताना एक अत्यंत सूचक विधान केले आहे. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा एक संधी आम्ही दिली होती. आता आमचा पक्ष फुटला असे सांगितले जात आहे. पण पक्ष फूटला नाही. पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेला पक्ष फुटला असे म्हणता येणार नाही. मागे आम्ही संधी दिली. पण आता परत संधी द्यायची नसते आणि मागायचीही नसते, असे म्हणत शरद पवार यांनी कारवाईबाबत सूचक संकेत दिले आहेत.
दरम्यान, शरद पवार यांची आज कोल्हापूर येथील दसरा चौकात एक सभा पार पडते आहे. या सभेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. त्यामुळे आपल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु असताना पवार आज कोल्हापूरमध्ये काय बोलतात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.