Sharad Pawar vs Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे की नाही? पवारांचे नेमकं चाललंय तरी काय काय? असे एक ना अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात उपस्थित होऊ लागले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. एका बाजूला शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात की, 'मी असे बोललोच नाही' तर दुसऱ्या बाजूला अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात 'नो कमेंट्स'. तिसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात 'राजकीय भूमिका वेगळ्या कुटुंबात फूट नाही'. त्यामुळे महाविकासआघाडीतही सावध पवित्रा घेतला जात आहे. राष्ट्रवादीतील प्रतिक्रिया पाहता शिवसेना (UBT) आक्रमक झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटच पडली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अजित पवार हे आमचे नेते असल्याचे शरद पवार यांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारले असता, "अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही," असे स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी उत्तर दिले. तसेच, सुप्रिया सुळे आणि ते (अजित पवार) बहिण भाऊ आहेत. त्यामुळे या नात्यातून त्या काही सहजपणे बोलल्या असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे. ते सातारा येथे बोलत होते.

संधी एकदा दिल्यावर परत मागायची नसते आणि द्यायचीही नसते

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देशपातळीवर फूट नाही. आमच्यातील काही लोकांनी वेगळा केला. तशी भूमिका घेतली. याचा अर्थ पक्ष फुटला असा होत नाही. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा आम्ही त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. पण अशी संधी पून्हा द्यायची नसते. आणि ती मागायचीही नसते, अशा शब्दातही शरद पवार यांनी अजित पवार यांना सुनावले.

नो कॉमेंट्स- अजित पवार

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी व्यक्त यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता 'नो कॉमेंट्स' म्हणत अजित पवार यांनी प्रश्नाला बगल दिली. शिवाय आपणास विकासाचे पॅशन आहे. त्यामुळे राज्यातील विद्यमान स्थिती नैसर्गिक, भौगोलीक याबातब काही विचारा, असेही ते म्हणाले.