राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केल्याप्रमाणे, त्यांचा पुतण्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची ऑफर दिली नसल्याची माहिती दिली. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या वडेट्टीवार यांनी दाब्वा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्याकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोबत आणल्यास मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही अजित पवार आणि शरद पवार यांची 'गुप्त' भेट झाल्यानंतर लगेचच हा खुलासा झाला होता.
आता शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानाप्रमाणे आपल्याला कोणत्याही ऑफरची माहिती अजित पवार यांनी दिली नाही. शरद पवार शनिवारी पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरी गेल्याचे फुटेज प्रादेशिक वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले होते. त्यावेळी अजित पवार त्याच ठिकाणाहून निघताना दिसले होते.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा हवाला देऊन काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले होते की, भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषीमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली गेली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत शरद पवार म्हणाले, ‘माझ्या पुतण्याला भेटण्यात काय चूक आहे? जर कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याला कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला भेटण्याची इच्छा असेल, तर त्यात काळजीचे काय कारण?’ (हेही वाचा: Mumbai-Goa Highway च्या रखडलेल्या कामावरून मनसे होणार आक्रमक; कोकणी माणसालाही दक्ष राहण्याचे आवाहन)
ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा पक्ष (NCP) भाजपसोबत युती करणार नाही. भारतीय जनता पक्षासोबतची कोणतीही संघटना राष्ट्रवादीच्या राजकीय तत्त्वांच्या विरोधात आहे.’ दरम्यान, निवडणूक आयोगाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटांना पक्षाचे नाव आणि अधिकृत चिन्हासंदर्भातील नोटीसला उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांनी मुदतवाढ दिली. मुळात शरद पवार गटाने निवडणूक मंडळाला पत्राद्वारे चार आठवड्यांच्या मुदतवाढीची विनंती केली होती. दोन्ही गटांना ८ सप्टेंबरपर्यंत उत्तरे सादर करायची आहेत.