Raj Thackeray | Twitter

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पनवेल मध्ये पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करण्याकरिता आले असता त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून पुन्हा सरकारला खडे बोल सुनावले आहेत. मागील 17 वर्षांपासून मुंबई-गोवा रस्त्याचं (Mumbai Goa Highway) काम सुरू आहे. अजूनही ते पूर्णत्त्वास गेले नाही. आता पनवेल पासून सिंधुदुर्ग पर्यंत मनसैनिकांनी हे आंदोलन हातामध्ये घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असं आवाहन केलं आहे.

2024 पर्यंत मुंबई-गोवा रस्ता पूर्ण होणार असल्याचं सरकार कडून सांगितलं जात आहे पण आता गणपतीला गावी जाणार्‍यांचं काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. या रस्त्याचं काम सुरू नव्हतं तेव्हा लोकं निदान आपापल्या ठिकाणी पोहचत तरी होते असं म्हणत त्यांनी रस्त्याच्या दुर्देशेवरून सुनावलं आहे.

राज ठाकरे यांनी आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गासाठी सुमारे 15 हजार 566 कोटी रूपये खर्च केल्याचं म्हटलं आहे. तर खराब अवस्थेमुळे सुमारे अडीज हजार लोकांचे जीव गेले असल्याचं म्हटलं आहे. कोकणात जमिनीचे व्यवहार कोणासाठी आणि कशासाठी होत आहेत? याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. यावेळी कुंपण शेत खातंय… असा आरोपही त्यांनी लावला आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसे ने युट्युबर जीवन कदम याचा कोकणातील रस्त्याचा व्हीडिओ शेअर करत खड्ड्यांमुळे टायर फुटण्याच्या गंभीर प्रकार प्रकाशझोकात आणला आहे.

कोकणी माणसाला दक्ष राहण्याचे आवाहन 

कोकणामध्ये अनेक उत्तरभारतीय जमीनी विकत घेत आहेत. या मुद्द्याकडे लक्ष  वेधून  घेताना त्यांनी भाजपाचे गोवा चे मुख्यमंत्री आपल्याला गोव्याचा गुडगाव करायचा नाही असं म्हणाले असल्याचे सांगतात जसा त्यांच्याकडे शेतजमीन शेतीसाठीच विकली जाते तशी स्थिती महाराष्ट्रात का नाही? असा सवाल विचारला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

खोक्याच्या नावाने ओरडणार्‍यांकडे कंटेनर असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे. केवळ 'भावनिक विषय' काढून, बाळासाहेबांकडे मतं दिली जातात आणि नंतर हे सगळं करायला मोकळे होतात. खराब रस्ते मग त्यातून पुन्हा टेंडर, टक्केवारी हे चक्र सुरू ठेवलं जातं त्याला रोखा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.