Supriya Sule | Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर मिळाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. अशा कोणत्याही ऑफरची आपल्याला मिळालेली नाही किंवा कोणतेही बोलणे झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी काका शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याची ऑफर दिल्याचा दावा एका माजी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मला कोणीही ऑफर दिलेली नाही. 15 ऑगस्ट निमित्त अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे आणि त्याच ऑफरबाबत माहित आहे, बाकी काही माहित नाही. ऑफरबाबत माझ्याशी काही बोलणेही झाले नाही. पवार साहेब आणि मी असे कोणतेही विधान केलेले नाही. काँग्रेस अशी विधाने का करत आहे हे मला कळत नाही. तुम्ही काँग्रेस नेत्यांना विचारायला हवे की ते अशी विधाने का करत आहेत. मी वैयक्तिकरित्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, गौरव गोगोई यांसारख्या शीर्ष काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहे. मला महाराष्ट्रातील काँग्रेस नेते अशी विधाने का करत आहेत हे माहित नाही.’

अनेक माध्यमांनी काँग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचा हवाला देत दावा केला आहे की, अजित पवारांनी शरद पवारांना ऑफर दिली होती. अहवालात माजी मुख्यमंत्र्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, ‘अजित पवार यांनी आपल्या काकांना सांगितले होते की, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री किंवा नीती आयोगाचे उपाध्यक्षपद दिले जाईल. तर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचा अनुक्रमे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समावेश होणार आहे.’ आपल्या पुतण्याचा हा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळून लावल्याचा दावाही या माजी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच भाजपशी कोणत्याही प्रकारे युती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे म्हटले आहे.

अहवालानुसार, शरद पवार आणि अजित पवार यांची 12 ऑगस्ट रोजी पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी 'गुप्त बैठक'  झाली होती. या बैठकीला शरद पवार यांच्यासह जयंत पाटीलही उपस्थित होते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या काका-पुतण्याच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली होती. (हेही वाचा: Maharashtra Politics: 'शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद' विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा)

राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून अजित पवार एनडीएमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे शरद पवारांनी त्यांना भेटू नये, असे काँग्रेस आणि शिवसेनेने (यूबीटी) म्हटले आहे. नाना पटोले यांनीही अशी बैठक मान्य केली जाणार नसल्याचे सांगितले होते. राहुल गांधी यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतची 'गुप्त भेट' म्हणजे कौटुंबिक भेट असल्याचे म्हटले जात आहे. 2 जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट  महाराष्ट्रातील एनडीए सरकारमध्ये सामील झाला होता.