Ajit Pawar, Sharad Pawar (PC - Facebook)

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षांत अनेक आश्चर्यकारक युत्या, आघाड्या बघायला मिळल्या आहेत. वर्षभरापूर्वी  महाविकास आघाडी फुटून शिवसेनेचा एक गट आधी भाजपाला मिळाला आणि त्यानंतर वर्षभराने अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली एनसीपीचा एक गट सत्तेत सहभागी झाला आहे. एनसीपी मध्ये फूट पडली तरीही अजित पवार- शरद पवार यांच्यात अधूनमधून भेटीचं सत्र होत असल्याने अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. कॉंग्रेस कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची भाजपा कडून ऑफर आहे. आणि यामध्ये आता शरद पवारांचा पाठिंबा मिळाला तरच हे अजित पवारांचं स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतं असं सांगितलं जात आहे.

विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाच्या या अटीसाठी अजित पवार, शरद पवारांची वारंवार भेट घेत असल्याचं एका वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. नुकतीच अजित पवारांची पुण्यात उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली आहे. ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती.

विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार मविआचा विश्वास तोडणार नाही अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. दरम्यान महिनाअखेरीस मुंबई मध्ये 'इंडिया'ची मुंबई मध्ये बैठक होणार आहे. त्याच्या यजमानपदी ठाकरे गटासोबत शरद पवार देखील आहेत. 'पक्षांना निवडणूकांचा सामना करावाच लागतो त्यामुळे परिस्थितीनुसार आमचे प्लॅन्स देखील तयार आहेत' असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत. लोकसभेच्या 48 जागांसाठी सध्या सारेच पक्ष चाचपणी करत असल्याचं ते म्हणाले आहेत.  नक्की वाचा: Raj Thackeray आणि उद्धव ठाकरे एकत्र? राजकीय वर्तुळात नवी चर्चा .

शरद पवार एकीकडे भाजपा सरकार विरूद्ध बिगर भाजपा सरकार राज्यात विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरी कडे कधी नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसणंं, अजित पवारांसोबत बैठका घेणं यामुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.