Raj Thackeray And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष झाले. त्यानंतर अल्पावधीतच राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? (Raj and Uddhav Thackeray Come Together) येणार किंवा नाही? हा प्रश्न चर्चिला जातो आहे. अनेकदा एकमेकांना टाळीसाठी हात पुढे करण्यावरुन आणि जाहीररित्या 'शुकशुक'वरुन दोन्ही बंधुंमध्ये टिकाटिप्पणीही झाली. मात्र, दोघे एकत्र येण्याबाबतची चर्चा केवळ चर्चाच राहीली. आता मात्र, राजकीय स्थिती प्रचंड बललली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधान आले आहे.
मशाल दाखवणार इंजिनला प्रकाश?
एकनाथ शिंदे यांच्या रुपात शिवसेना पक्षात मोठे बंड झाले आणि निवडणुक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण आणि शिवसेना हे चिन्हही गेले. त्यामुळे त्यांनी उर्वरीत शिलेदारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्थापन केला. ज्याला निवडणूक आयोगाकडून 'मशाल' हे चिन्ह देण्यात आले. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा वेळी मनसेने भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न अनेकदा करुन पाहिला. पण, त्याला यश आले नाही. परिणामी ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी भावना दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा पुढे आली. मुंबईमध्ये शिवसेना (UBT) आणि मनसे कार्यकर्त्यांनी राज-उद्धव येकत्र या असे पोस्टर्स झळकावले. ज्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता हे दोन्ही बंधुही एकत्र येण्याबाबत विचार करण्यावर राजी झाले आहेत. मात्र, त्याला अधिकृत असे कोणताही दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मशाल राज ठाकरे यांच्या मनसे इंजिनला प्रकाश दाखवणार का? याबाबत उत्सुकता आहे.
'हीच ती वेळ ठाकरे बंधू एकत्र येण्याची'
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळत चर्चा सुरु असतानाच आता मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चेला अधिक बळकटी मिळाली आहे. महाजन यांनी 'एबीपी माझा' या खासगी वृत्तवाहिनीशी म्हटले आहे की, उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रवाही असलेली चर्चा पुन्हा एकदा वेग धरु लागली आहे. दरम्यान, महाजन यांनी आपल्या वक्तव्यात एक भलताच मुद्दा मांडला आहे. राज्यात जे काही राजकारण घडले आहे त्यावर जनतेच्या मनात नाराजी आहे. प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता राज ठाकरे यांच्यातच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी समजून घेऊन राज यांच्याकडे नेतृत्व देण्यासाठी आशीर्वाद द्यावेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट?
लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरु आहे. त्याच्या कामासाठी ठाकरे बंधू एकमेकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. संभाव्य भेटीत राजकीय चर्चा होणार का याबातब उत्सुकता आहे.