Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sharad Pawar Nashik abha: 'माझा अंदाज चुकला, मी आपली माफी मागतो, येत्या काळामध्ये चूक दुरुस्त केली जाईल', असे म्हणत आपल्या हटके स्टाईलने शरद पवार यांनी नाशिक येथील जनतेच्या भावनेला हात घातला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर शरद पवार प्रथमच जाहीर सभेला संबोधित करत होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील आमदारांनी बंड केले. बंडखोर आमदारांपैकी नऊ जणांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली. या नऊ मध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचाही समावेश आहे. उल्लेखनिय असे की, शरद पवार यांनी आपल्या झंजावती दौऱ्याची सुरुवातही नाशिक येथून केली. नाशिक हे छगन भुजबळ यांचे होमग्राऊंड आहे. त्यांच्या होमग्राऊंड येवला येथूनच शरद पवार यांनी अजित पवार गटाला आव्हान दिले.

शरद पवार यांनी या भाषणात सांगितले की, आज मी या ठिकाणी आलो ते कोणावर टीका, टिप्पणी करण्यासाठी आलो नाही तर माफी मागायला आलो आहे. माझा अंदाज सहसा चुकत नाही. पण ही गोष्ट मी मान्य करतो. मला या वेळी अंदाज आला नाही. माझी चुक झाली. माझ्या चुकीमुळे आपणास वेदना झाल्या असतील. तर माझे कर्तव्य आहे आपली माफी मागणे. म्हणून मी माफी मागत आहे. पुढच्या वेळी चूक दुरुस्त केली जाईल. त्याची खबरदारी घेतली जाईल, असेही शरद पवार यांनी म्हटले. (हेही वाचा, Supriya Sule at Nashik: 'जो डर गया, वो मर गया', सुप्रिया सुळे यांचा नाशिक येथे घणाघात)

शरद पवार यांनी आपल्या जुन्या सर्व सहकाऱ्यांची नावे घेतली. ज्यांनी सुरुवातीच्या काळात शरद पवार यांना साथ दिली होती. मात्र, आपल्या संबंध भाषणात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव एकदाही घेतले नाही. पण, जरी भुजबळ यांचे नाव घेतले नाही तरी देखील आपल्या भाषणाचा पूर्ण झोत हा पवार यांनी भुजबळ यांच्यावरच ठेवला होता. दरम्यान, शरद पवार यांच्या सभेसाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी गर्दी केली होती. खास करुन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.