
वृद्ध महिलेला तिच्या झोपडीसह जाळून मारल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील मान (Man Taluka) तालुक्यात उघडीकस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा (Satara Crime News) दाखल करुन दोन संशयीतांना अटक केली आहे. संशयीत आरोपींपैकी एकाने गुन्हा कबुल केल्याची माहिती आहे. केवळ पैशांच्या मोहापायी आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे सीताबाई जयसिंग गलांडे (वय 72) तर नाना दिगंबर गलांडे (वय २०, राहणार जाशी) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही मान तालुक्यातील जाशी येथील राहणारे आहेत. घडलेल्या घटनेबाबत परिसरात संताप आणि हळहळ अशा संमिश्र भावना आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सीताबाई गलांडे यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना मुलबाळ नाही. त्यामुळे त्या एकट्याच आपल्या झोपडीत राहात असत. त्यांच्या घरीही फारसे कोणी असायचे नाही. शेजारी राहणारा नाना गलांडे हा मात्र त्यांच्याकडे सतत येतजात असे. तो या वृद्ध महिलेला पैशासाठी वारंवार तगादा लावत असे. त्रासही देत असे. ही महिला आणि त्यांच्या पैशांवरुन देवाणघेवाण होत असायची किंवा नाहीयाबाबत फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, नाना गलांडे यांने 5 जानेवारी या दिवशी रात्रीच्या वेळी या महिलेची झोपडी पेटवून दिली. जवळपास कोणीही नसल्याने या घटनेचा कोणालाही पत्ता लागला नाही. (हेही वाचा, Shivshahi Bus Fire at Satara: सातारा येथे शिवशाही बसला आग, पोलिसांकडून एकाला अटक)
दरम्यान, घटना घडल्याच्या दोन दिवसांनंतर महिलेचा भाचा तिला भेटण्यासाठी झोपडीकडे गेला असता ही घटना उघडकीस आली. सीताबाई यांची झोपडी जळाली असून त्यात त्यांचाही मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने भाच्याला धक्काच बसला. त्याने नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना माहिती दिली. दरम्यान, मृत महिला सीताबाई यांचे नातेवाईक हरीबा चोरामले यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीत नाना गलांडे हा सीताबाई यांना त्रास देत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावरुन पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.