मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दुपारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) प्रगती कामाचा आढावा घेतला. या आढाव्याच्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण श्री. ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती देण्यात आली.
विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृद्धी आणणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील, नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या 1 मे पर्यंत पूर्ण होऊन तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठीही खुला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे 347 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.
नागपूर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी, 8,364 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे 60 टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणाच्याही कामांना प्राधान्य देण्यात आले असून, अमरावती जिल्ह्यातील 38 नाल्यांचे 91,210 मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धी देखील झाली आहे.
नागपूर ते शिर्डी हा मार्ग येत्या 1 मे पर्यंत व त्यानंतर मुंबई पर्यंतचे काम पुढच्या एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा महामार्ग दळणवळणाच्या सर्वोत्कृष्ट सुविधांसोबतच कृषी व पूरक उद्योगांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यामुळे तो राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी रोल मॉडेल ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.