वाद काही थांबेना! Nawab Malik यांच्या विरुद्ध समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंची न्यायालयात धाव; दाखल केली अवमान याचिका
Sameer Wankhede, Nawab Malik | (Photo Credit Twiiter)

एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. आता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्ञानदेव यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, न्यायालयाचे आश्वासन असूनही मलिक यांनी आपल्या कुटुंबाची बदनामी करणे सुरूच ठेवले आहे. याचिकेत मलिक यांनी केलेल्या 3 उल्लंघनांचाही उल्लेख आहे.

यामध्ये 28 डिसेंबर 2021, 2 आणि 3 जानेवारी 2022 बाबत नमूद करण्यात आले आहेत. वानखेडेचे वडील ज्ञानदेव यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यात इतर गोष्टींबरोबरच मलिक यांना सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद विधाने पोस्ट करण्यापासून थांबवण्याची विनंती करण्यात आली होती. ज्ञानदेव वानखेडे यांनी 1.25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंत्री मलिक यांनी केलेले सर्व आरोप वारंवार फेटाळले आहेत. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात क्रुझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान वाद सुरू झाला. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या मित्राला एनसीबीने अटक केली होती. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. बनावट कागदपत्रे आणि बनावट जात प्रमाणपत्र सादर करून एससी कोट्यातून त्यांनी सरकारी नोकरी मिळवली. त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नसून दाऊद वानखेडे आहे, असे मलिक म्हणाले होते. (हेही वाचा: केंद्र स्पष्टपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुढे ढकलत आहे, IAS अधिकार्‍यांच्या बदलीवर प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य)

काही दिवसांपूर्वी मलिक यांनी सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफीही मागितली होती. नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर एक विधान जारी केले होते, ज्यासाठी त्यांना न्यायालयाने फटकारले होते आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यात मलिक यांनी वानखेडे प्रकरणामध्ये यापुढे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आश्वासन दिले होते.