
ठाकरे गटाच्या युवती सेनाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकास आघाडीकडून ठाणे पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे त्याचे नेतृत्व करणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्त कार्यलयापर्यत मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस पक्षाचे नेते विक्रांत चव्हाण तसेच खासदार विनायक राऊत, राजन विचारे सहभागी होणार आहेत.
ठाणे पोलिसांच्या निष्क्रिय आणि पक्षपाती कारभाराविरोधात महाविकास आघाडीचे नेत्यांकडून याविरोधात आवाज उठवला जाणार आहे. विरोधी पक्षाच्या लोकांवर हल्ले करण्यात येत आहेत. मात्र, पोलिसांकडून साधी कारवाई करण्यात येत नाही. असा त्यांचा दावा आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. असे त्यांचे मत आहे. याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी ठाण्यात दुपारी 3 वाजता शिवाजी मैदानापासून मोर्चा सुरु होणार आहे. तो थेट पोलीस आयुक्तालयावर धडकेल.
काल रोशनी शिंदे यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालय गाठलं होतं पण कार्यालयात पोलिस आयुक्त उपस्थित नव्हते. Uddhav Thackeray: ठाणे काय महाराष्ट्रातील गुंडगिरी एका क्षणात उघडून फेकू; उद्धव ठाकरे यांचा इशारा .
3 एप्रिलला रोशनी शिंदे यांना मारहाण झाली. ती शिंदे गटाच्या काही महिलांनी केल्याचा त्यांचा दावा आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार रोशनी यांना कोणतीही गंभीर दुखापत, फ्रॅक्चर नाही.
ठाण्यातील या घटननंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच, रोशनी शिंदे या वारंवार मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार विरोधात आणि आक्षेपार्ह भाषेत पोस्ट टाकत होत्या. त्यामुळे आपला संयम संपला आणि आम्ही त्यांना समजावले. त्यांना मारहाण झाल्याचे जे सांगतिले जात आहे तसे काही घडलेच नाही, असे सांगितले.