IPL 2025 (Photo Credit - X)

भारत-पाकिस्तान तणावामुळे शुक्रवार, 9 मे रोजी आयपीएल 2025 मध्यंतरीच स्थगित करण्यात आले. या घटनेनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) चांगले संबंध असलेल्या इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड ECB ने IPL 2025 चे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. परंतु आतापर्यंत BCCI ने या ऑफरबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 एका आठवड्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, पाकिस्तानचे भ्याड हल्ले रोखल्याबद्दल बीसीसीआयने भारतीय लष्कराचे कौतुक केले.

अजुन किती सामने बाकी?

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 58 सामने पूर्ण झाले आहेत, ज्यामध्ये धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रद्द झालेला सामना देखील समाविष्ट आहे. क्वालिफायर 1, क्वालिफायर 2, एलिमिनेटर आणि ग्रँड फायनलसह अजून 12 ग्रुप स्टेज सामने शिल्लक आहेत. आगामी सामन्यांबद्दल बोलताना, बीसीसीआयने म्हटले आहे की परिस्थिती हाताळल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबद्दल अधिक माहिती योग्य वेळी दिली जाईल.

इंग्लंडमध्ये आयपीएलचे आयोजन होऊ शकते

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आयपीएल 2025 पूर्ण करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. द क्रिकेटरमधील वृत्तानुसार, ECB ने अधिकृतपणे BCCI शी संपर्क साधला आहे आणि आयपीएल 2025 चे उर्वरित सामने इंग्लंडमध्ये आयोजित करण्याची आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था करण्याची ऑफर दिली आहे.