
Brazil Murder Mystery: ब्राझीलमध्ये एका बॉडीबिल्डिंग डॉक्टरने (Bodybuilding Doctor) आपल्या पत्नीला विष देऊन ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी लुईझ गार्निका (Luiz Garnica) आणि त्यांची 67 वर्षीय आई एलीझाबेते अर्राबाका यांच्यावर पत्नी लारिसा रोड्रिग्ज (Larissa Rodrigues) यांच्या खुनाचा आरोप करण्यात आला आहे. विषप्रयोग करुन पत्नीचा खून केल्यानंतर काही तासांतच गार्निका आपल्या प्रेयसीसोबत डेटवर गेल्याचे तपासात उघड झाले आहे. या धक्कादायक हत्याकांडाने ब्राझीलमध्ये खळबळ उडाली आहे.
विवाहबाह्य संबंधातून हत्या
आमचे सहकारी इंग्रजी संकेतस्थल लेटेस्टलीने The Mirror या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लारिसाला पतीच्या अफेअरचा संशय आला होता. तिला गार्निकाच्या कारमध्ये सेक्स टॉईज सापडले होते आणि त्याने साओ पावलोमध्ये केलेल्या प्रवासात तो एकटा नव्हता, असे तिला वाटू लागले. लारिसाने गार्निकाचा एक व्हिडिओदेखील शोधून काढला होता, ज्यामध्ये तो आपल्या प्रेयसीच्या इमारतीत जाताना दिसत होता. मात्र गार्निकाने हे सर्व फेटाळून लावत तिला 'वेडी झाली आहे' असा आरोप करत पत्नीच्या कोणत्यात दावा आणि आरोपाकडे त्याने लक्ष दिले नाही.
आईच्या हातच्याच सूपमध्ये विष?
लारिसाच्या मृत्यूपूर्वी काही दिवस ती तब्येत बिघडल्याची तक्रार करत होती. तिने खाल्लेले सूप गार्निकाच्या आईने बनवले होते. शवविच्छेदनात तिच्या शरीरात chumbinho नावाचे अत्यंत विषारी उंदीर मारण्याचे औषध आढळले. पोलीस तपासात असेही समोर आले की, लारिसाच्या मृत्यूपूर्वी सुमारे 2 आठवड्यांपूर्वी, एलीझाबेते या विषाची माहिती ऑनलाइन शोधत होत्या. यावरून पोलिसांनी संशय घेतला की हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित होता.
दरम्यान, पत्नीच्या मृत्यूनंतर गार्निकाने सोशल मीडियावर 'ती माझी खरी प्रेमिका होती' अशा प्रकारची भावनिक पोस्ट टाकली होती. मात्र पोलिस तपासात त्याच्या अभिनयाचा पर्दाफाश झाला. गार्निका व त्यांची आई यांना अटक करण्यात आली असून तपास अधिक खोलवर सुरु आहे. पोलिस आता गार्निकाच्या प्रेयसीच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. तिच्यावर बनावट पुरावा देऊन गार्निकाला मदत केल्याचा संशय आहे. तपास सुरू असून या खुनामागचा खरा हेतू आणि घटनाक्रम उघड होण्याची शक्यता आहे.