Measles Outbreak in Mumbai: राज्यात गोवर (Measles) चा कहर वाढताना दिसत आहे. अशातचं आता मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) भागातील चार वर्षांच्या लसीकरण (Vaccination) न झालेल्या मुलीचा शुक्रवारी गोवरामुळे मृत्यू झाला. तसेच शहरात गेल्या 24 तासांत संसर्गाची सात नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महानगरात गोवरच्या रुग्णांची संख्या 447 वर पोहोचली आहे, तर संशयित मृत्यूंची संख्या चार झाली आहे. गोवरामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यामुळे मृत्यूची संख्या आठ वर कायम आहे, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा - Measles Report: एका गोवरच्या रुग्णाकडून तब्बल 18 रुग्णांना होवू शकते लागण, WHO कडून विशेष सुचना जारी)
दरम्यान, 4 वर्षीय मुलीला 6 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 9 महिने ते पाच वर्षे वयोगटातील 2,24,130 मुलांपैकी, एकूण 26,721 मुलांना गोवर-रुबेला विशेष डोसचे अतिरिक्त डोस देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Aurangabad Measles: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना जारी)
तथापी, 6 महिने ते 9 महिन्यांच्या विभागातील 4,745 मुलांपैकी, एकूण 953 मुलांना एमआर लसीचा 'शून्य डोस' देण्यात आला आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये दिवसभरात 38 मुलांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 29 मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 8 डिसेंबरपर्यंत गोवर रुग्णांची संख्या 940 होती, तर मृतांची संख्या 17 होती.