Remdesivir Black Market in Thane। Photo Credits: Twitter/ANI

ठाण्यामध्ये आज क्राईम ब्रान्च ऑफ पोलिसच्या (Crime Branch of Thane Police) पथकाने धाड टाकत रेमडेसीवीरच्या 21 बाटल्या ताब्यात घेत 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गैर मार्गाने या औषधाची विक्री केली जात असल्याने त्यांना अटक केली आहे. सध्या राज्यातील वाढती कोरोनारूग्ण संख्या पाहता या आजारात उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसीवर चा काळाबाजार, साठेबाजी होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण होऊन केमिस्ट बाहेर मोठीच मोठी रांग पहायला मिळाली आहे.

क्राईम ब्रान्चच्या अ‍ॅन्टी एक्सटॉर्शन सेल कडून मुलुंड पश्चिम येथील पद्मश्री नर्सिंग होम ला समन्स पाठवत त्यांच्या 2 कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मूळ रक्कमेच्या चौपट रक्कमेमध्ये वायल्स विकल्या जात असल्याचं आढळल्याचं वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

समाजसेवक डॉ. बिनू वर्गीस यांनी ग्राहक होत त्यांच्याकडून 16 रेमडीसीवीर घेतली. त्यावेळी त्यांना आरोपींनी प्रत्येकी 5500 रूपये आकरले. डॉ. वर्गीस यांच्या टीप वरूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यानंतर तीन हात नाका परिसरामध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान डॉ. वर्गीस यांनी अजून एका ठिकाणी वाढीव दराने रेमडीसीवीर विकणार्‍यांचे एक रॅकेट उधळण्यास पोलिसांना मदत केली आहे. तेथे रेमडीसीवीर 10,000 रूपयाला विकले जात होते. त्यामुळे आज (10 एप्रिल) दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ठाण्यातून 21 इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत. Remdesivir तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांची उत्पादकांसोबत बैठक, दिले 'हे' महत्वाचे निर्देश.

महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांनाही सरसकट रेमडीसीवीरचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. तर विक्रीसाठी कमाल दर देखील 1100-1400 पर्यंत निश्चित केला आहे. यामध्ये वाढती मागणी पाहता निर्मिती देखील दुप्पट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.