मेडेन फार्मास्युटिकलने (Maiden Pharmaceuticals Limited) बनवलेल्या कफ सिरपची राज्यात आणि मुंबई शहरात विक्री आणि उत्पादन होत नाही, असे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सांगितले आहे. डब्ल्यूएचओने बंदी घातलेले कफ सिरप शहरातील कोणत्याही रुग्णालयात वापरले जात नाही किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील केमिस्टमध्ये ते विकले जात नसल्याचेही सांगण्यात आले आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय कंपनी मेडेन फार्मास्युटिकल्सने बनवलेल्या चार खोकला आणि सर्दी सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. या कफ सिरपमुळे गांबिया देशातील 66 मुलांचा मृत्यू झाला असू शकतो, असे संस्थेने म्हटले आहे.
या घटनेनंतर देशात हे कफ सिरप विकले जात आहे का याची चौकशी होत आहे. याबाबत एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘महाराष्ट्रात मेडेन फार्मास्युटिकल कफ सिरपचे उत्पादन किंवा विक्री करण्यात आम्ही कोणतीही भूमिका बजावत नाही. 2015 मध्ये गुजरात एफडीएने गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी झाल्यामुळे कंपनीने बनवलेल्या गोळ्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. शिवाय, केंद्र सरकारने असेही स्पष्ट केले की ही उत्पादने भारतात विकली जात नाहीत.’
डब्ल्यूएचओने बुधवारी सांगितले की, चार मेडेन उत्पादनांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणाने डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलच्या ‘अस्वीकार्य’ मात्रा असल्याची पुष्टी झाली आहे, जी विषारी असू शकते, यामुळे मूत्रपिंडाला दुखापत होण्याची शक्यता आहे. डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकोल अँटीफ्रीझ आणि ब्रेक फ्लुइड्स आणि इतर औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात, परंतु काही फार्मास्युटिकल उत्पादनांमध्ये स्वस्त पर्याय म्हणून देखील ते वापरले जाते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य औषध नियंत्रकाने या कंपनीला फक्त प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन बीपी, कोफेक्सनालिन बेबी कफ सिरप, मॅकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप या चार औषधांच्या निर्यातीसाठी परवाना दिला होता. मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे केवळ निर्यातीसाठी उत्पादित केलेली ही चारही औषधे भारतात उत्पादन आणि विक्रीसाठी परवानाकृत नाहीत. मेडेन फार्मास्युटिकल्सच्या या चार औषधांपैकी एकही औषध देशांतर्गत विकले जात नाही. (हेही वाचा: हरियाणातील 4 कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा; सोनीपतमधील औषध कारखान्याला कुलूप, CDSCO कडून तपास सुरू)
या कफ सिरपवर डब्ल्यूएचओच्या बंदीनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता एफडीए अधिकारी आणि डॉक्टरांनी नागरिकांनी या कफ सिरपच्या बातम्यांमुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. हे कफ सिरप घरगुती कारणासाठी वापरले जात नाही किंवा कोणत्याही केमिस्ट आणि हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. शिवाय, नागरिकांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही सिरप घेऊ नये, असेही आवाहन केले आहे.