साताऱ्यातील (Satara) कोरोना पॉझिटीव्हिटी रेट वाढल्याने शनिवारपासून पूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosale) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयामुळे सर्वसामन्यांसह व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आठवड्यातील शेवटचे 2 दिवस कडक टाळेबंदीस विरोध नाही. मात्र, जिल्ह्यात लावलेले निर्बंध अन्यायकारक आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात लावलेली टाळेबंदी ताबडतोब शिथिल करावी, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच प्रत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी साताऱ्यात पुन्हा लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाबाबत भाष्य केले. जिल्ह्यातील रुग्ण संख्या अटोक्यात आल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, आठवड्याभरातच प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर केला. या निर्णयाला सगळ्यांचा विरोध आहे. जिल्ह्यात वेळेचे निर्बंध ठेवा. परंतु, कडक लॉकडाऊन करू नये. आठवड्यातील शेवटचे दोन दिवस कडक लॉकडाऊन करा. परंतु, प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुण्यासारख्या शहरात रुग्ण संख्या वाढत नाही आणि साताऱ्यासारख्या लोकसंख्येने विरळ असलेल्या शहरात रुग्णसंख्या वाढत आहे, हे प्रशासनाचे अपयश असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. हे देखील वाचा-Devendra Fadnavis: कोरोनाच्या नावाखाली ठाकरे सरकारकडून लोकशाहीला कुलूप, देवेंद्र फडणवीस यांची महाविकासआघाडी सरकारवर टीका
सातारा सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दुसऱ्या लाटेदरम्यान दिसून येत होते. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येने नवनवे उच्चांक प्रस्थापित केले होते. त्यानंतर हा आकडा काहीसा उतरणीला लागल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा ही संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 790 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.